ब्रिटिश पोलीस अधिकारी साँडर्स याची हत्या १९२८ मध्ये झाल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) क्रांतिकारक भगतसिंग यांचे नाव नव्हते, त्यामुळे त्यांच्या फाशीनंतर ८३ वर्षांनी ते निदरेष असल्याचे सिद्ध झाले आहे.
भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाझ रशीग कुरेशी यांनी भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधीक्षक जॉन साँडर्स याच्या हत्येप्रकरणी जो एफआयआर दाखल झाला होता त्याची साक्षांकित प्रत याचिकेद्वारे मागितली होती. भगतसिंग यांना या प्रकरणी १९३१ मध्ये लाहोरमधील शादमान चौकात फाशी देण्यात आले, त्या वेळी ते २३ वर्षांचे होते.
याचिकेनंतर लाहोर पोलिसांनी अनारकली पोलिस ठाण्यातील नोंदींचा शोध घेतला व त्यांना साँडर्सच्या खुनाच्यावेळचा एफआयआर मिळाला. तो उर्दूत असून १७ डिसेंबर १९२८ रोजी सायंकाळी दोन अज्ञात इसमांनी साँडर्सची हत्या केली असे त्यात म्हटले आहे.
 अनारकली ठाण्याचे पोलीस अधिकारी यात तक्रारदार होते. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी म्हटले होते की, पाच फूट पाच इंचाचा हिंदू चेहऱ्याचा एक मिशीवाला, मजबूत अंगयष्टीचा माणूस पांढरा पायजमा व राखाडी कुर्ता घालून आला होता व त्याच्या डोक्यावर काळी टोपी होती. या घटनेत कलम ३०२, १२०१ व १०९ लावले होते.
साक्षीदारांची साक्षच नाही
या प्रकरणी ४५० साक्षीदार न तपासताच विशेष न्यायालयाने भगतसिंग यांना फाशीची शिक्षा दिली असे कुरेशी यांचे म्हणणे आहे. त्यांना त्यावेळच्या एफआयआरची प्रत मिळाली असून त्यात भगतसिंग यांचे नाव नाही.
भगतसिंग यांच्या वकिलांना उलटतपासणीची संधी देण्यात आली नाही. भगतसिंगांचा खटला पुन्हा चालू करावा अशी मागणी कुरेशी यांनी याचिकेत केली असून भगतसिंग हे साँडर्स हत्या प्रकरणात निर्दोष होते असे त्यांचे म्हणणे आहे. लाहोर उच्च न्यायालयाने त्यांची याचिका सरन्यायाधीशांकडे पाठवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा