संसदेत आणि संसदेच्या बाहेर धूर पसरवणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बेरोजगारीमुळे आणि देशातल्या इतर समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं आहे. या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार ललित झा यानेही उशिरा आत्मसमर्पण केलं.
चार आरोपींना अटक
सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोघांना लोकसभेत गदारोळ आणि पिवळा धूर पसरवल्याप्रकरणी अटक केली. तर अमोल आणि नीलम या दोघांना लोकसभेच्या बाहेरून अटक केली.दिल्ली पोलिसांनी या सगळ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्यांवर इतरही कलमांद्वारे गुन्हा दाखल करणार आहे.
या सगळ्यांचे सोशल मीडिया प्रोफाईल काय सांगतात?
नीलम आजादचं सोशल मीडिया प्रोफाईल सांगतं की ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आहे. नीलम एका परीक्षेची तयारी करत होती असंही समोर आलं आहे. नीलमचा आदर्श भगत सिंग आहे असंही तिचं प्रोफाईल सांगतं. नीलमच्या कुटुंबाचा दावा आहे की तिने M.A. , B.Ed. M. Ed. केलं आहे. शेतकरी आंदोलन, बेरोजगारीच्या मुद्द्यावर तिने भाष्य केलं आहे. तिच्या सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचे फोटोही आहेत.
ललित झा या आरोपीने रात्री उशिरा आत्मसमर्पण केलं आहे. त्यानेच नीलम आणि अमोल शिंदे या दोघांचा लोकसभे बाहेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ललित हा सोशल मीडियावर कायमच मोदी सरकारविरोधात भाष्य करायचा. सुभाषचंद्र बोस, फिडेल कास्रो, चंद्रशेखर आझाद यांना तो आदर्श मानतो. स्वामी विवेकानंद आणि जे कृष्णमूर्ती यांचाही तो अनुयायी आहे असं त्याने सोशल मीडियावर म्हटलं आहे. डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या एनजीओचा तो सचिवही आहे. या एनजीओने महात्मा गांधींऐवजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो चलनावर असावा अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर ललित झा कायमच मोदींच्या विरोधात पोस्ट करत असतो अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
अमोल शिंदे
अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूरचा राहणारा आहे. भगतसिंग यांना तो आदर्श मानतो. त्यांच्या विचारांचे मजकूर असलेले आणि त्यांचे फोटो असलेले टीशर्टही तो घालतो हे दिसून आलं आहे. त्याच्या कुटुंबाने दावा केला आहे की तो शंकराचा भक्त आहे. त्याला लष्करात किंवा पोलिसात भरती व्हायचं होतं असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर शहीदांच्या बलिदानाला वंदन असं लिहिलं आहे. लातूरचा अमोल शिंदे मुंबईत अनेकदा गेला आहे असंही त्याचं सोशल मीडिया प्रोफाईल सांगतं.
सागर शर्मा
सागर शर्माने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर त्याची ओळख सायलेंट व्हॉल्कॅनो अशी केली आहे. साधी राहणी आणि उच्च विचार असंही त्याने म्हटलं आहे. तसंच रायटर, पोएट, फिलॉसॉफर, अॅक्टर, थिंकर आणि आर्टिस्ट असंही त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये लिहिलं आहे असं दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितलं. सागर शर्मा श्रीकृष्णाचाही भक्त आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले संदेश तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. आपण जिंकू किंवा हरू पण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता हे बघायचं आहे की प्रवास कसा असेल? संसदेत गदारोळ करण्याच्या आधी त्याने ही पोस्ट लिहिली होती असंही दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे.
डी मनोरंजन
डी मनोरंजन हा तरुण मैसूरचा राहणारा आहे. त्याने इंजिनिअरींग केलं आहे. लोकसभेत धूर पसरवणाऱ्या दोन तरुणांपैकी हा एक तरुण आहे. मनोरंजन सोशल मीडियावर नाही. तो अभ्यासू आहे असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. भायखळा टू बँकॉक, वॉटर सोर्स, आर्ट ऑफ वॉर, ऑलिव्हर ट्विस्ट अशी पुस्तकं त्याने वाचली आहेत असंही त्याच्या वडिलांनी सांगितल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
पूर्वनियोजित कट
हे चारही आरोपी सोशल मीडियाच्या एका पेजमुळे संपर्कात आले. लोकसभेत मोठं काहीतरी करायचं यासाठी ते कट आखत होते. हे सगळे जण दीड वर्षांपासून हा कट करत होते. भगत सिंग फॅन क्लब या फेसबुक पेजवरुन हे संपर्कात होते आणि सिग्नल या मेसेज अॅपवरुन ते एकमेकांच्या संपर्कात होते असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.