भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आठवणीत रामेश्वरमध्ये एक संग्रहालय तयार करण्यात आलं आहे. तिथे अब्दुल कलाम यांचं जे शिल्प आहे ते वादात सापडलं आहे. कारण या शिल्पाजवळ गीतेचा श्लोक ठेवण्यात आल्यानं या शिल्पावरून वाद सुरू झाला आहे. डीएमके आणि इतर राजकीय पक्षांनी कलाम यांच्या शिल्पाजवळ ठेवण्यात आलेल्या गीता श्लोकावर आक्षेप घेतला आहे. कलाम यांचे कुटुंबियही यामुळे नाराज झाले आहेत. कलाम यांच्या शिल्पाजवळ सगळ्या धर्मग्रंथाचे अंश असले पाहिजे अशी मागणी कलाम कुटुंबानं केली आहे.
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वीणा शिल्पाजवळ फक्त गीतेचा श्लोक ठेवणं हा जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप डीएमके नेते स्टॅलिन यांनी केला आहे. तिरूक्करल या महान तामिळ ग्रंथातले श्लोक त्या शिल्पाजवळ का नाहीत? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कलाम यांच्या शिल्पाजवळ गीतेतला श्लोक ठेवून त्यांना फक्त हिंदू धर्म आवडत होता हे सांगण्याचा प्रय़त्न तर सरकार करत नाहीये ना? या श्लोकामुळे मुस्लिम समाजाचा अपमान झाला आहे त्यामुळे हा श्लोक तातडीनं हटविण्यात यावा अशी मागणी नेते तिरूमवलन यांनी केली आहे.
ग्रीसच्या संसदेत जेव्हा कलाम बोलायला उभे होते तेव्हा त्यांनी तिरूक्करलमधल्या काही ओळी वाचून दाखवल्या होत्या. मग भाजपनं फक्त भगवद्गीतेतला श्लोक कलाम यांच्या शिल्पाजवळ का ठेवला? यामागे भाजपचं राजकारण आहे असा आरोप एमडीएमकेचे नेते वायको यांनी केला आहे. कलाम यांचं हे शिल्प पाहून ते संघ परिवाराचे समर्थक होते असं वाटतं त्यामुळे हे शिल्प तातडीनं हटविण्यात यावं अशी मागणी धहलान बकवी यांनी केली आहे.
तसंच ए.पी.जे अब्दुल कलाम यांना सगळ्या धर्मांबाबत सारखाच आदर होता, मात्र भाजपनं जाणीवपूर्वक गीतेतलाच श्लोक त्यांच्या प्रतिमेजवळ ठेवला असंही बकवी यांनी म्हटलं आहे. कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यावरील संग्रहालयाचं आणि या शिल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र आता याच शिल्पावरून वाद सुरू झाला आहे.