पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत. गुजरात सरकारने यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती जितू वाघानी यांनी यावेळी दिली आहे. ६वी ते १२वीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले.
“भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्थेचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा बदल होईल. भगवद् गीतेतील मूल्य आणि तत्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील”, अशी माहिती जितू वाघानी यांनी सभागृहात दिली.
६वी ते ८वीच्या अभ्यासक्रमांमध्ये भगवद् गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात भगवद् गीता समाविष्ट करण्यात येईल, असं देखील वाघानी म्हणाले.
यासोबतच, शाळांमध्ये प्रार्थना, श्लोक पठन, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील भगवद् गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.