Bhagwant Mann on US deportation flights landing in Amritsar : भारतातून अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरीतांना पुन्हा मायदेशी पाठविणारे दुसरे विमान शनिवारी (१५ फेब्रुवारी) अमृतसर विमानतळावर उतरणार आहे.या विमानात ११९ भारतीय नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी मात्र अमेरिकेती स्थलांतरीतांना भारतात उतरवण्यासाठी अमृतसर शहराची निवड केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेतून १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी आणखी दोन विमाने स्थलांतरितांना घेऊन येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मान यांनी पंजाबला बदनाम करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे का? दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ही भेट आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

या मुद्द्यावर शुक्रवारी बोलताना मान म्हणाले की, “अमेरिकेत बेकायदेशीरपणे स्थलांतरित झाल्याचा आरोप असणार्‍या भारतीय नागरिकांना घेऊन येणारे विमान उद्या अमृतसर येथे उतरणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला विमान उतरवण्यासाठी अमृतसरची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली हे सांगावे, जेव्हा पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प भेटत होते, अमेरिकेचे अधिकारी आपल्या लोकांना बेड्या घालत होते. टम्प यांनी दिलेले हे गिफ्ट आहे का?.”

जर ५ फेब्रुवारी रोजी अमृतसरमध्ये उतरलेल्या पहिल्या स्थलांतरितांच्या विमानात बहुतेक जण गुजरातचे होते तर मग ते विमान अहमदाबादला का पाठवले गेले नाही, असा प्रश्नही मान यांनी विचारला . मान यांनी स्थलांतरितांना भारतात घेऊन येताना विमान उतरवण्यासाठी लँडिंग साइट म्हणून अमृतसरची निवड करण्याच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ५ फेब्रुवारी रोजी अमेरिकन लष्कराचे सी-१७ हे विमान १०४ भारतीयांना घेऊन अमृतसर विमानतळावर आले होते. ज्यामध्ये हरियाणा, गुजरात आणि पंजाबच्या नागरिकांचा अधिक भरणा होता.

आज दुसरे विमान उतरणार

द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आज भारतात येत असलेल्या विमानात पहिल्या विमानाप्रमाणे भारतीय नागरिकांना बेड्या, साखळ्या घातल्या जाणार नाहीत. पहिल्या विमानातील नागरिकांच्या हातात बेड्या घातल्यामुळे भारत सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. भारतीयांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला होता. लोकसभेत या विषयावरून गदारोळ उडाल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी निवेदन दिले होते. भारतीयांना अमानवीय वागणूक दिल्याचा मुद्दा अमेरिकेसमोर मांडला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

स्थलांतरितांना घेऊन येणारे दुसरे विमान शनिवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात पंजाबचे ६७, हरियाणाचे ३३, गुजरातचे ८, उत्तर प्रदेशचे ३, महाराष्ट्र आणि राजस्थानचे प्रत्येकी २ आणि गोवा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचा प्रत्येकी एक प्रवासी असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagwant mann slam centre over us deportation flights landing in amritsar marathi news rak