राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक मोहन भागवत यांनी ‘हिंदू राष्ट्र’विषयक केलेली विधाने ही धार्मिक नव्हे तर सामाजिक संदर्भात केलेली होती, असे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाने आज स्पष्ट केले.
‘भागवत जे काही बोलले ते सामाजिक संदर्भात होते हे समजून घेतले पाहिजे. अन्य धर्माचे लोक हे हिंदू आहेत असे धार्मिक संदर्भात ते बोललेले नाहीत. सामाजिक संदर्भात त्यांनी ते विधान केले होते आणि त्यात आक्षेपार्ह काही नाही’, असे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दुल रशीद अन्सारी यांनी रविवारी सांगितले.
कवी इक्बाल यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीताचे उदाहरण देत अन्सारी म्हणाले की, हे गाणे हा देश हिंदुस्तान आहे आणि या देशात राहणारे लोक हिंदी आहेत असेच सांगते.
कटक येथे झालेल्या एका रॅलीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे विधान केले होते की, जर्मनीतील लोकांना जर्मन, इंग्लंडमधील लोकांना इंग्लिश आणि अमेरिकेतील लोकांना अमेरिकन असे संबोधले जाते तर हिंदुस्तानात राहणाऱ्या लोकांना हिंदू असे का संबोधले जाऊ नये.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात जातीय दंगलीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे निखालस खोटे आहे, असेही अन्सारी यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारांची जबाबदारी
 ‘आमच्या पक्षाला दोष देता येईल असे काहीही घडलेले नाही. एखाद्या ठिकाणी जातीय दंगलीसारख्या घटना घडल्या असतील त्याची जबाबदारी त्या त्या ठिकाणच्या राज्य सरकारांची आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक दंगेखोरीच्या घटना घडल्या असून तिथे समाजवादी पार्टी सत्तेत आहे. महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यांत जिथे आमचा पक्ष सत्तेत नाही तिथे अशा प्रकारच्या घटना घडल्याचे अन्सारी म्हणाले.
कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारांची जबाबदारी असते आणि त्यासाठी भाजपला जबाबदार धरता येणार नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा