सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचा आरोप

दादरीसारख्या घटनांचा संघाशी संबंध जोडणे चुकीचे असून, हे बदनामीचे षड्यंत्र असल्याचा आरोप सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केला. येथे झालेल्या तीन दिवसीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी टीकाकारांना संघाचे कार्य समजून घेण्याचे आवाहन केले. आरक्षणाच्या धोरणाचा फेरआढावा घेण्याची कोणतीही मागणी संघाने केलेली नाही. जोपर्यंत समाजाला गरज तो पर्यंत आरक्षण सुरू राहावे ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. देशात ज्या काही घटना घडल्या त्यातील सत्य बाहेर आलेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या घटनांच्या आडून संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा हिंदू समाजाचा अपमान असल्याचा दावा त्यांनी केला.

ज्या घटना घडल्या त्या समाजासाठी चांगल्या नाहीत. संघाने त्याचा नेहमीच निषेध केला आहे. या घटनांमागील सत्य शोधण्याचा काही जणांनी प्रयत्न केला तेव्हा आरोपांमध्ये काहीच तथ्य आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाच्या भावनांचा आदर संघाने नेहमीच केला असून, ९० वर्षे संघ सार्वजनिक जीवनात काम करत आहे. असहिष्णुतेचा आरोप कुणीही केलेला नाही.

पाण्याचा प्रश्न गंभीर

पाण्याचा प्रश्न भविष्यात देशापुढील गंभीर समस्या असेल, जनतेच्या सक्रिय सहभागातून यावर मात करता येईल, असे भय्याजी जोशी यांनी स्पष्ट केले. संघाच्या येथील बैठकीत या समस्येवर मात करण्यासाठी विचार करण्यात आला. स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

 

Story img Loader