केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. अनेक राज्यांमध्ये सुरु असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. आंदोलक आणि विद्यार्थी संघटनांनी काल (रविवार) बिहार बंदची हाक दिल्यानंतर आता भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक राज्यांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दिवसेंदिवस अग्निपथ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. हजारोंच्या संख्येने तरुण रस्त्यांवर निदर्शने करताना दिसत आहेत. अग्निपथ योजनेसंदर्भात तीनही सैन्य दलाकडून एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अग्निपथ योजना रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत सैन्य भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अधिक विरोध
अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. मात्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये या विरोधाचे प्रमाण अधिक आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमधील विद्यार्थांनी रसत्यावर उतरुन तोडफोड करत रेल्वेच्या डब्यांना आग लावल्याची घटना घडली आहे. काल (रविवार) विद्यार्थ्यांनी बिहार बंदची हाक दिली होती. या हाकेला विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. दिल्लीतील जंतरमंतरवर काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता बिहारमधील तरुणांनी भारत बंदची हाक दिली आहे.

प्रशासन सतर्क
बिहारमधील अग्निपथ योजनेला वाढता विरोध पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. बिहार राज्यातील १७ राज्यांमधील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच बिहारसोबत उत्तर प्रदेश, पंजाब हरियाणा पोलीस यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.