काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधील थौबल येथून आज सुरूवात झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वज दाखवून यात्रेला सुरूवात करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनी स्थानिकांशी चाय पे चर्चा केली आहे.
राहुल गांधी यांनी गेल्यावर्षी भारत जोडो यात्रा केली होती. भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. याची परिणती कर्नाटक आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतून दिसून आली. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा आयोजित केली आहे. मणिपूर ते मुंबई असा हा प्रवास असणार आहे. या यात्रेला आजपासून थौबल येथून सुरुवात झाली. “२९ जून २०२३ रोजी मी मणिपूरला आलो होतो. त्यावेळी मी जे काही पाहिले, जे काही ऐकले. ते त्याआधी कधीच एकले किंवा पाहिले नव्हते. २००४ पासून मी राजकारणात आहे. पण त्यावेळी मी जे पाहिले, ते मणिपूर याआधी नव्हते. पण तरीही आजवर पंतप्रधान याठिकाणी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आलेले नाहीत. कारण त्यांना आणि भाजपाला मणिपूरशी काहीही देणेघेणे नाही. तुमचे दुःख त्यांचे दुःख नाही”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा >> ‘मणिपूरचे अश्रू पुसण्यासाठी पंतप्रधान मोदी का नाही आले?’ सरकारला लक्ष्य करत भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात
दरम्यान, भारत न्याय यात्रेला सुरुवात केल्यानंतर राहुल गांधी यांनी सायंकाळची चहा स्थानिकांसोबत घेतला. एका सार्वजनिक ठिकाणी त्यांनी एका खुर्चीवर ठाण मांडून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पदयात्रा सुरू करण्याआधी राहुल गांधी म्हणाले, “सरकारची व्यवस्था पूर्णपणे ढासळली होती. ज्याला आपण मणिपूर म्हणत होतो, २९ जूननंतर ते मणिपूर राहिले नाही. मणिपूर विभागला गेला. प्रत्येक ठिकाणी द्वेषाची पेरणी झाली. लाखो लोकांना याचा फटका बसला. अनेकांना जवळचे लोक गमवावे लागले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत एकदाही इथल्या जनतेचे अश्रू पुसण्यासाठी आलेले नाहीत. ही शरमेचे बाब आहे. कदाचित नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला मणिपूर भारताचा भाग आहे, हे माहीतच नसावे. तुमचे दुःख हे त्यांना स्वतःचे दुःख वाटत नाही.”