तापी : गुजरातमधील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सुरत जिल्ह्यातील ‘स्वराज आश्रमा’ला भेट दिली. यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींना आदरांजली वाहून अभिवादन केले. चार दिवसांत गुजरातमधील सात जिल्ह्यांतून या यात्रेच्या गुजरातमधील टप्प्याचा समारोप झाला. राहुल गांधींनी रविवारी सुरत जिल्ह्यातील बारडोली येथील ‘स्वराज आश्रमा’ला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण केली. १२ मार्च रोजी दुपारी दोनला महाराष्ट्रात प्रवेश करेल. नंदुरबार जिल्ह्यातून जिथे आदिवासी संमेलन आयोजित केले आहे. त्याद्वारे या यात्रेला पुन्हा सुरुवात होईल.
हेही वाचा >>> महिला कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन; देशात तीन कोटी ‘लखपती दीदीं’चे लक्ष्य
राजस्थानात काँग्रेसचे माजी मंत्री भाजपमध्ये
जयपूर : राजस्थानमधील काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र यादव आणि लालचंद कटारिया यांच्यासह अनेक नेत्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबरोबर काँग्रेसचे माजी आमदार रिचपाल मिर्धा, विजयपाल मिर्धा आणि खिलाडी बैरवा, माजी अपक्ष आमदार आलोक बेनिवालस यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
हरियाणातील भाजप खासदाराचा काँग्रेस प्रवेश
नवी दिल्ली : हरियाणामधील भाजपचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अपरिहार्य राजकीय कारणांमुळे भाजप सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर सिंह यांनी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.