नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत जोडो यात्रा’ या मोहिमेवर भाजपने जोरदार टीका केली आहे. ‘भारत जोडो यात्रा’ म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे, अशा शब्दांत भाजपने या मोहिमेवर टीका केली. या मोहिमेला भाजपने ‘पोकळ’ असे संबोधले. पक्षावर गांधी कुटुंबाचे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राहुल गांधी यांना नेता म्हणून स्थापित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे, असे टीकास्त्र भाजपने बुधवारी सोडले.
हेही वाचा >>> नितीश कुमारांनी भाजपाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर रविशंकर प्रसाद यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘‘सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडून जात असून राहुल गांधी स्वत: पक्षाचे एकीकरण करू शकले नाहीत आणि ते ‘भारत जोडो मोहीम’ चालवत आहे. मूलत: ही एक कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात असताना कुटुंबाचा आणि पक्षाचा राजकीय विस्तार कमी होत चालला आहे. हे देशाला एकत्र आणण्यासाठी नाही तर राहुल गांधी यांचा पुन्हा पक्षाचा प्रमुख नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.’’
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी ‘भारत जोडो यात्रे’चे वर्णन ‘शतकातील सर्वात मोठा विनोद’ असे केले. आज आपण ज्या भारतामध्ये राहतो तो लवचीक, मजबूत आणि एकसंध आहे. १९४७ मध्येच केवळ भारताची फाळणी झाली कारण काँग्रेसने ती मान्य केली होती. एकीकरण हवे असेल तर राहुल गांधींनी ‘भारत जोडो यात्रे’साठी पाकिस्तानला जावे,’ असे ट्वीट सर्मा यांनी केले.