काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. या समारोपासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते आणि इतर विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले आहेत. राहुल गांधी यांच्या भगिनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी देखील समारोप सभेला उपस्थित आहेत. आज सकाळपासूनच काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. या बर्फवृष्टीतच प्रियांका गांधी यांनी आपले भाषण पूर्ण केले. बर्फवृष्टी होत असूनही काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसला. आज सकाळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे लहान मुलांप्रमाणे बर्फात खेळताना सकाळी दिसले होते.
त्या म्हणाल्या, “या देशाच्या संविधानासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात आदर आहे. जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी खुल्या मनाने भारत जोडो यात्रेचे स्वागत केले. जेव्हा माझा भाऊ काश्मीरकडे येत होता, तेव्हा माझ्या आईला आणि मला त्यांनी मेसेज केला. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये जाताना मी आपल्या घरी जातोय असं वाटतंय. माझ्या घरातील लोक माझी वाट पाहतायत. त्यांची आणि माझी गळाभेट झाल्यानंतर मी घरातल्या लोकांना भेटेल असं वाटतंय”
हे वाचा >> भारत जोडो यात्रेचा आज समारोप समारंभ, शिवसेनेसह १२ पक्ष सहभागी होणार, ‘या’ ५ पक्षांना निमंत्रण नाही
“संपूर्ण देशाने भारत जोडो यात्रेला पाहिलं आणि समर्थनही दिलं. आज देशात जी राजकीय परिस्थिती आहे, त्यातून देशाचे भले होणार नाही. ही यात्रा एक अध्यात्मिक यात्रा राहिली असे मला वाटतं. सत्य, अहिंसा आणि बंधुतेच्या आधारावर हा देश बनला. ही मूल्य आपण जपली पाहीजेत. भारत जोडो यात्रेने आपल्याला प्रेम आणि एकतेचा रस्ता दाखवला आहे. या बर्फवृष्टीत इथे जमलेल्या प्रत्येकाला मी धन्यवाद देऊ इच्छिते की, तुम्ही सर्वांनी या देशाला एक नवा आशेचा किरण दाखवला आहे. हा आशेचा किरणच देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल.”, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी दिली.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १४५ दिवस, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरु झालेल्या या यात्रेचा आज समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी देशभरातील २१ समविचारी पक्षांना काँग्रेसने निमंत्रण दिलं आहे.