काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या आईबरोबरच एक फोटो शेअर केला आहे. दिल्लीमध्ये सोनिया गांधी आज राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी झाल्या. त्याचवेळी राहुल यांनी आपल्या आईबरोबरचा हा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या यात्रेला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरु झाली असून सध्या ती दिल्लीत दाखल झाली आहे.
आज हजारो लोकांनी राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. फरिदाबादमधून राहुल गांधींनी दिल्लीत प्रवेश केला. दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अनिल चौधरी यांनी राहुल यांचं स्वागत केले. येथील आश्रमाममध्ये सर्वांना तीन तास विश्रांती घेतली. दिल्लीमध्ये या यात्रेने प्रवेश करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, पवन खेरा, रणदीप सुरजेवाला, भुपिंदर सिंग हुड्डा, कुमारी शैलजा हे नेते राहुल गांधींबरोबर होते. या यात्रेमध्ये सोनिया गांधी आणि राहुल यांची बहीण प्रियंका गांधी यांनीही सहभाग घेतला.
राहुल गांधींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनिया गांधी मास्क घालून उभ्या असल्याचं दिसत आहे. सोनिया गांधींच्या मागे उभ्या असलेल्या राहुल यांनी आपल्या आईच्या गळ्यात घात घालून खांद्यावर अनुवटी टेकवत हसतानाचा हा फोटो आहे. जे प्रेम आईकडून मिळतं तेच देशामध्ये वाटत आहे, अशा अर्थाच्या कॅप्शनसहीत राहुल गांधींनी हा फोटो शेअर केला आहे. “जो मोहब्बत इनसे मिली है, वही देश से बांट रहा हूं।” अशी हिंदीमध्ये कॅप्शन या फोटोला दिली आहे.
या फोटोला पहिल्या तीन तासांमध्ये ४८ हजार लाईक्स आणि साडेसात हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत.
ही यात्रा आज लाल किल्ल्यापर्यंत जाणार असून या ठिकाणी सायंकाळी मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा पुढील नऊ दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आता ३ जानेवारी रोजी ही यात्रा पुन्हा दिल्लीमधून पुढील प्रवास सुरु करणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या दृष्टीने ही नऊ दिवसांची नियोजित विश्रांती घेतली जात आहे.