राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ पुढील महिन्यात जम्मू-काश्मीरला पोहचणार आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची तयारी सुरू झालेली आहे. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन, सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली. उपराज्यपालांकडून यात्रेला सुरक्षा प्रदान करण्याबाबतचे आश्वासन देण्यात आले आहे.
काश्मीरमध्ये या यात्रेत केंद्र सरकारच्या अन्य विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत. सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्याबाबत निमंत्रण देण्यात आले असुन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती, सीपीएम नेते एमवाय तारिगामीही यात्रेत सहभागी होणार आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि सीपीएम नेते एमवाय तारिगामी हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
या अगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. २६ डिसेंबर रोजी काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल, जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील आणि नेते विकार रसूल वानी यांच्यासह गुलाम अहमद मीर आदींनी उपराज्यापालांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांनी भारत जोडो यात्रेसाठी प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित केले. केसी वेणुगोपाल यांनी ट्वीटद्वारे उपराज्यपालांच्या भेटीबाबत माहिती दिली होती.