नवी दिल्ली : करोनानिर्बंध पालनाच्या केंद्राच्या आदेशानंतर, राजधानी परिक्षेत्रात दाखल झालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे शनिवारी दिल्लीत आगमन होत आहे. यात्रेला अजूनही राजघाटावर जाण्याची परवानगी दिलेली नसल्याने ही यात्रा लालकिल्ल्यावर थांबेल. त्यानंतर राहुल गांधी कारमधून राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीच्या दर्शनासाठी जातील. भाजपने या यात्रेला ‘शुभेच्छा’ दिल्यामुळे राजकीय वाद मात्र तीव्र झाला आहे.
कन्याकुमारीहून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा १०८ व्या दिवशी दिल्लीत पोहोचत असून गेल्या काही दिवसांपासून राजधानीत अस्वस्थता वाढू लागल्याचे दिसते. काहीही झाले तरी भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकणार नाही, हे राहुल गांधींचे विधान संबंधितांनी (भाजप) लक्षात ठेवले पाहिजे, असा आक्रमक संदेश काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी ट्वीटद्वारे सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्याला भाजपनेही उपहासात्मक टिपण्णी करून प्रत्युत्तर दिले आहे. ‘भारत जोडो यात्रा सुरू ठेवावी असे मला वाटते. राहुल गांधी जिथे जिथे जातात, तिथे काँग्रेसचा पराभव होतो. यात्रेमध्ये राहुल यांनी करोनासंदर्भातील निर्बंधांचे पालन करावे एवढेच सांगायचे आहे’, असा टोला केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लगावला आहे. यात्रेमध्ये करोनानिर्बंधांचे पालन करावे अन्यथा यात्रा स्थगित करावी अशी सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी राहुल गांधींना केली. करोनाच्या मुद्दय़ावरून आत्तापर्यंत कोणी राजकारण केलेले नाही, यापुढेही करू नये, असेही मंडाविया राज्यसभेत म्हणाले.
मंडावियांची सूचना राहुल गांधी यांनी अव्हेरली असून भारत जोडो यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपच्या मनात धडकी भरल्याची टीका काँग्रेसचे नेते करत आहेत. त्यावरही भाजपने शुक्रवारी प्रतिहल्ला केला असून भाजपला घाबरण्याजोगे काही नाही. राहुल गांधींची काँग्रेसलाच भीती वाटते. राहुल गांधी गुजरातमध्ये गेले नाहीत, हिमाचल प्रदेशमध्येही त्यांनी प्रचार केला नाही. राहुल गांधींनी आयुष्यभर पदयात्रा करत राहावी, भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा टिप्पणी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केली.
कमल हासन सहभागी होणार?
राजस्थानमधून ही यात्रा हरियाणामध्ये दाखल झाली, शुक्रवारी या राज्यातील अखेरच्या दिवशी द्रमुकच्या नेत्या व खासदार कणीमोळी यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दिल्लीमध्ये अभिनेते कमल हासनही यात्रेमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. दिल्ली शहरामध्ये शनिवारी दिवसभराच्या प्रवासानंतर या पदयात्रेचा लालकिल्ल्यावर समारोप होईल. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर ३ जानेवारीपासून उत्तर प्रदेशमधून यात्रेचा पुढील टप्पा सुरू होईल.