खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. दिल्लीमध्ये आल्यानंतर राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील उद्योग, चीन-भारत संघर्ष यावर भाष्य केले. भारतात तयार झालेली उत्पादने जगभरात पोहोचायला हवीत. हातातील मोबाईल, अंगातील कपडे, पायातील बुटांवर मेड इन चायना नव्हे तर मेड इन इंडिया असायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले. हे सरकार नरेंद्र मोदी यांचे नसून हे सरकार अदानी-अंबानी यांचे आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच त्यांनी भारत-चीन संघर्षावरही भाष्य केले.
“देशात माध्यमांमध्ये फक्त हिंदू-मुस्लीम वादावर चर्चा घडवून आणली जाते. मात्र माध्यमांवर दाखवला जात असलेला हा संघर्ष खरा नाही. देशात खूप प्रेम आहे. देशातील सामान्य नागरिक एकमेकांवर प्रेम करतात. देशातील ९० टक्के लोक जात, प्रांत, धर्म या बाबी सोडून एकमेकांवर प्रेम करतात. देशातील लोक प्रेमाने एकमेकांसोबत राहतात. देशातील प्रमुख मुद्द्यांवरून लक्ष विचलित व्हावे म्हणून हिंदू-मुस्लीम संघर्ष दाखवला जातो. हे नरेंद्र मोदी यांचे नव्हे तर अंबानी आणि अदानी यांचे सरकार आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा >>> नरेंद्र मोदींच्या पोषाखावरील आक्षेपार्ह टिप्पणीनंतर संताप, तृणमूलच्या नेत्याने मागितली माफी
“देशातील दोन-तीन अब्जाधीशांना हजारो कोटींचे कर्ज दिले जाते. मात्र छोट्या उद्योजकांना बँकेकडून कर्ज दिले जात नाही. छोटे उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली, चुकीच्या पद्धतीने वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी केली. छोट्या व्यापाऱ्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा शस्त्र म्हणून वापर करण्यात आला. छोट्या उद्योगांच्या माध्यमातूनच देशातील तरुणांना रोजगार मिळतो. मात्र छोट्या उद्योजकांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
हेही वाचा >> Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी आईबरोबरचा फोटो सोशल नेटवर्किंगवर केला शेअर; चर्चा फोटोला दिलेल्या कॅप्शनची
“भाजपाने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. मात्र मी त्यांना काहीही म्हणालो नाही. त्यांच्यात किती हिंमत आहे, हे जोखण्यासाठी मी त्यांना काहीही म्हणालो नाही. टीव्ही, माध्यमं, व्हॉट्सअॅप, फेसबूक सगळीकडे माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एका महिन्यात मी तुम्हाला सत्य दाखलवले. सत्या लपवता येत नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी भाजपावर केली.
हेही वाचा >> मोदी सरकारचा मोठा निर्णय: चीन, जपानसह ‘या’ देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी बंधनकारक!
“भारत जोडो यात्रा देशाला जोडण्यासाठी आहे. द्वेष, भीतीमुळे आपल्या देशाचे नुकसान होत आहे. याच कारणामुळे आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा काढली आहे. आम्ही काश्मीरमध्ये देशाचा ध्वज फडकवणार आहोत. सध्या भारत आणि चीन यांच्यात खरी लढत आहे,” असेही राहुल गांधी म्हणाले.
“चीनने भारताची जमीन घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की चीनने आपली जमीन घेतलेली नाही. मग लष्करातील अधिकारी चीनने जमीन घेतल्याचा दावा का करतात. चीन आणि भारताच्या सेनेमध्ये लढाई का होत आहे? चीन आणि भारत यांच्यात आर्थिक आघाडीवरही लढत आहे. आपल्याला शर्टावर, मोबाईल फोन्स, शूज यांच्यावर मेड इन चायना नव्हे तर मेड इन इंडिया असे लिहिलेले असायला हवे. हे आपण करून दाखवणार आहोत,” असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.