‘मुजरा’ हा नृत्य प्रकार वगळता कदाचित अन्य कोणताही नृत्याविष्कार न अनुभवलेल्या पाकिस्तानात तेथीलच युवतीने ‘भरतनाटय़म’ हा भारतीय शास्त्रीय नृत्याविष्कार सादर केला आणि इस्लामाबादच्या हवेत घुंगरांचा आवाज घुमताच उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
पाकिस्तानातील युवती अमना मवाझ ही गेल्या १४ वर्षांपासून भारतीय शिक्षिका इंदू चॅटर्जी यांच्याकडे भरतनाटय़मचे धडे गिरवीत आहे. पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्याशी विवाहबद्ध झाल्यापासून इंदू चॅटर्जी अनेक वर्षांपासून पाकिस्तानात स्थायिक झाल्या आहेत.
भरतनाटय़म या नृत्य प्रकारावर माझे प्रेम आहे, हा नृत्याविष्कार शिकण्यास सुरुवात केली तेव्हा पाकिस्तानातील २० जणी होत्या. आता केवळ मीच हे नृत्य अद्यापही शिकत आहे, अन्य सहकारी देशाबाहेर गेल्या अथवा काही जणींनी नृत्य शिकणेच सोडले, असे अमना मवाझ हिने सांगितले. अमनाच्या पालकांचा तिला पाठिंबा होता, तिच्या मैत्रिणी मात्र तेवढय़ा सुदैवी नव्हत्या.
नृत्याकडे कोणीही चांगल्या हेतूने पाहात नाही, लहान असताना शिकायला देतात, मात्र विशिष्ट वय झाल्यानंतर पालक त्याच्याकडे पाठ फिरविण्यासच सांगतात, असे मवाझ हिने सांगितले. तथापि, मवाझच्या नातेवाईकांना अद्यापही ती नृत्याविष्कार करते त्याची जाणीव नाही.
‘पाकिस्तान फॉर ऑल’ या बॅनरखाली मवाझने गेल्या रविवारी येथे भरतनाटय़म नृत्याविष्कार सादर केला आणि उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. विवाहापूर्वी माझ्या पतीचाही याला विरोध होता. आपले कुटुंब पारंपरिक असल्याने नृत्य शिकणे सोडावे, असे पतीला वाटत होते, असेही मवाझ हिने सांगितले. मात्र आता तिचा पती वकास खलिद हा तिच्या कार्यक्रमासाठी तिच्यासमवेतच जातो.
झिया-ऊल-हक यांच्या इस्लामीकरणामुळे अनेक कलांकडे ‘हराम’ म्हणून पाहिले जाते. तालिबाननेही अशा प्रकारच्या नृत्यांवर बंदी घातली आहे. मात्र अमना नृत्याविष्कार सादर करताना भारतीय संगीत आणि उर्दू कवितांचा मिलाफ साधते. पाकिस्तानातील कोणत्याही भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यासाठी हा प्रकार आश्चर्यकारक आहे, कारण त्यांच्यासाठीही पाकिस्तानात भरतनाटय़म हा प्रकारच सर्वस्वी नवा आहे.