आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाकडून ५२ उमेदवारांचा समावेश असलेली दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये कर्नाटकमधील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी २० मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदुरिप्पा हे शिमोगा मतदासंघातून लोकसभा निवडणूक लढणार असून दुसरे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा हे उत्तर बंगळुरूमधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहतील. तर तिरूवनंतपुरम मतदारसंघासाठी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री असलेल्या राजगोपाल यांची निवड करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पत्रकारपरिषदेत भाजप नेते अनंत कुमार यांनी उमेदवारांची जाहीर केली असून अनंत कुमार हे स्वत:  दक्षिण बंगळुरूमधून काँग्रेसच्या नंदन निलकेणी यांच्याविरोधात उभे ठाकणार आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी आतापर्यंत १०६ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे कोणत्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. यानंतर १३ मार्च रोजी भाजपच्या आणखी काही उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती या पत्रकारपरिषदेत देण्यात आली.