इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर या दोघांना दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी १२ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पाटणा येथून विशेष विमानाने दोघांना नवी दिल्लीला आणण्यात आले. देशभरातील त्यांची दहशतवादी कृत्ये उघडकीस आणण्यासाठी त्यांची चौकशी आवश्यक असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) न्यायालयात सांगितले. भटकळ आणि असदुल्ला अख्तरच्या वतीने एम. एस. खान यांनी युक्तिवाद केला. राष्ट्रीय तपास संस्थेने मोहम्मद अहमद सिदीबाप्पा आणि यासिन भटकळ हे दोघे एकच आहेत. त्याच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने त्या दोघांची रवानगी पोलीस कोठडीत केली. यासिन ४० दहशतवादी कृत्यांप्रकरणी हवा आहे. त्याच्या शोधासाठी ३५ लाखांचे इनाम होते. चौकशीत भटकळने पुणे, वाराणसी आणि हैदराबाद स्फोटांमध्ये सहभाग असल्याचे मान्य केले. बोधगया स्फोटांमध्ये सहभाग नसल्याचा दावा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘स्फोट होतातच’
भटकळला आपल्या कृत्यांचा जराही पश्चात्ताप झालेला नाही. उलट स्फोट होतच राहतात त्यात नवे काय, असे उद्दाम व्यक्तव्य त्याने बिहारमधील मोतिहारी येथे केले.
महत्त्वाची माहिती
भटकळला अटक करण्यात विविध यंत्रणांचा सहभाग असून, त्याच्याकडून महत्त्वाची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्याचा ताबा मिळावा म्हणून महाराष्ट्रासह काही राज्यांनी मागणी केली आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असे ते म्हणाले.