पाटण्यामधील साखळी बॉम्बस्फोट हे प्रत्येकी दोन दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या तीन गटांनी घडवून आणल्याचे बिहार पोलीसांनी सांगितले. इंडियन मुजाहिदीनचा सध्या अटकेत असलेला दहशतवादी यासिन भटकळ याचा साथीदार तेहसीन अख्तर ऊर्फ मोनू आणि वकास यांनीच या स्फोटांचा कट रचल्याचे तपासात आढळले आहे.
पाटण्यातील गांधी मैदानावर रविवारी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेच्यावेळी मैदानावर कमी तीव्रतेचे सहा स्फोट झाले. या स्फोटांमध्ये सहा जण मृत्युमुखी पडले असून, १०२ नागरिक जखमी झाले आहेत. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेनेच हे स्फोट घडवून आणले होते, असे एनआयए आणि बिहार पोलीसांनी केलेल्या तपासून आढळले होते. रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी १२.४५ या वेळात पाटण्यामध्ये सात बॉम्बस्फोट झाले. पैकी सहा स्फोट हे गांधी मैदानातच झाले होते.
पोलीसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी एकाचे नाव मोहम्मद इम्तियाज असे असून, तो इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे पोलीसांनी सांगितले. स्फोटांनंतर पळून जात असताना पाटणा रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली. दुसऱया संशयिताचे नाव तारिक ऊर्फ अनूल असे आहे. रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटामध्ये तारिक जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेहसीन, हैदर, तौफिक आणि निमन अशी अन्य संशयितांची नावे असल्याचे पोलीसांनी जाहीर केले आहे.
तेहसीन व्यतिरिक्त इतर सर्व संशयित आरोपी हे रविवारी सकाळी रांचीहून बसने पाटण्याला आले होते. पाटण्यामध्ये हे सर्वजण तीन गटांमध्ये विभागले गेले, अशी माहिती पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा