ठाण्यात ठाकरे गटाची पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिलांनी सोमवारी मारहाण केली होती. याचे महाराष्ट्रात राजकीय पडसाद उमटत असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बुधवारी ( ५ एप्रिल ) ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी रोशनी शिंदे प्रकरणावरून गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ( ६ एप्रिल ) शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भावना गवळींनी सांगितलं, “रोशनी शिंदे यांना काहीही झालं नाही, असं पोलीस अहवालात निप्षन्न झालं आहे. तरी फक्त स्टंटबाजी करून सरकार आणि एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले जात आहेत. यांच्याकडे हेच काम उरले आहे.”
“त्यामुळे खोटे बोलणाऱ्यांची तपासणी करून चौकशी करण्यात यावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जावेत,” अशी गृहमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी केल्याचं भावना गवळींनी सांगितलं.
“शीतल म्हात्रे प्रकरणात पोलीस तपासात जे निष्पन्न झाले, त्याचा अहवाल का मागितला जात नाही. एक महिला म्हणून त्यांच्या पाठिशी यांच्यातील कोणी उभे राहिले नाहीत. आता महिलांना समोर करून राजकारण करण्यात येत आहे,” अशी टीका भावना गवळींनी ठाकरे गटावर केली आहे.
“महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही…”
दरम्यान, प्रियंका चतुर्वेदींनी सांगितलं की, “मी अमित शाहांना म्हणाले की, महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत अहवाल मागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही महिलांबरोबरच्या अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.”
“गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस पीडित महिलेच्या मागे लागले”
“हे खरं आहे की, महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले आहे. संभाजीनगर दंगलीत कशी हिंसा झाली, हे सर्वांनी पाहिलं आहे. आता रोशनी शिंदेंना मारहाण झाली आहे. त्यांना मारहाण झाली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस पीडित महिलेच्या मागे लागली आहे. ही कोणत्या प्रकारची कायद्याची स्थिती आणि कोणता न्याय आहे,” असं मत प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो”, भर सभेत नवनीत राणांचा हल्लाबोल; म्हणाल्या, “बाळासाहेब ठाकरे सुद्धा…”
“मी अमित शाहांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली”
“मी अमित शाहांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे. त्यावर ते मला म्हणाले की, आम्ही दोषींवर कारवाई करू. याबाबत त्यांनी आश्वासन दिलं आहे,” असंही चतुर्वेदी यांनी नमूद केलं.