भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला आहे. देवबंद या ठिकाणी ते कारने जात होते. तेव्हा काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार गेला. या गोळीबारात चंद्रशेखर आझाद जखमी झाले आहेत. एक गोळी कारच्या दरवाजातून आरपार जाऊन आझाद जखमी झाले आहेत. ही गोळी त्यांच्या बरगडीला चाटून गेली आहे. हल्ला करून हल्लेखोर तिथून पसार झाले. आझाद यांना ताबडतोब देवबंद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चंद्रशेखर त्यांच्या फॉर्च्यूनर कारने देवबंद दौऱ्यावर निघाले होते. देवबंदजवळ पोहोचले तेव्हा अचानक काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळी त्यांच्या बरगडीला चाटून गेली आहे. त्यांच्या कारवर अनेक गोळ्यांचे ठसे दिसत आहेत. कारच्या सगळ्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरू केला आहे.
हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. कार हे हल्लेखोर गोळ्या झाडून लगेच तिथून पसार झाले. आझाद यांना मानणारा एक मोठा वर्ग देशभरात आहे. त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून नाकेबंदी
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर ज्या कारने आले होते, त्या कारचा नंबर हरियाणात नोंदणीकृत आहे. हल्लेखोर पळून जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी देवबंदसह सहारनपूर परिसरात अनेक ठिकाणी नाकेबंदी केली आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासलं जात आहेत, जेणेकरून हल्लेखोरांची ओळख पटू शकेल, त्यांची माहिती मिळू शकेल.
या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. विपिन ताडा यांनी सांगितलं की, काही वेळापूर्वी चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही गाड्यांमधून आलेल्या सशस्त्र लोकांनी गोळीबार केला. एक गोळी आझाद यांच्या कमरेजवळ चाटून गेली आहे. त्यांची प्रकृती गंभीर नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस याप्रकरणाचा कसोशिने तपास करत आहेत.