कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयातूनही दिलासा मिळू शकलेला नाही. गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील तेलतुंबडे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता.

नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कारवाई केली होती. या कारवाईविरोधात तेलतुंबडे यांनी प्रथम मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांची गुन्हा रद्द करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली असली तरी त्यांना कारवाईपासून देण्यात आलेले संरक्षण ४ आठवड्यांपर्यंत कायम ठेवले आहे. तपासाची व्याप्ती प्रचंड वाढली असल्यामुळे कार्यवाही रद्द करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. दरम्यान, आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचे सांगत तेलतुंबडे यांनी आपल्याविरोधातील सर्व आरोपांचे खंडण केले आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे तेलतुंबडेंविरोधात अनेक पुरावे असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती.

Story img Loader