Elderly Woman Died of Starvation: घरातल्या वृद्धांना त्यांच्या मुलांकड़ून क्रूर वागणूक दिली जात असल्याच्या अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. काही वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमाचाही पर्याय स्वीकारतात. पण या सर्व निष्ठुरतेच्या पलीकडे जाणारं भयंकर वर्तन एका मुलानं आपल्या जन्मदात्या आईबाबत केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या भोपाळमध्ये समोर आली आहे. आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध व आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या जन्मदात्या आईला घरात बंद करून मुलगा थेट फिरायला निघून गेला. त्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
हा सगळा प्रकार भोपाळमध्ये घडल्याचं इंडिया टुडेच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८० वर्षांच्या ललिता दुबे मुलगा अरुणसोबत भोपाळच्या निशातपुरा भागामध्ये राहात होत्या. पण या दुर्दैवी घटनेच्या दिवशी अरुण त्याच्या कुटुंबाबरोबर उज्जैनला फिरायला निघून गेला. जाताना त्यानं घराला बाहेरून कुलूप लावलं. ललिता दुबे या वृद्धापकाळातील आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या. त्यामुळे त्यांना जागेवरून उठणं अशक्य झालं होतं.
उज्जैनला गेल्यानंतर अरुणनं इंदौरमध्ये राहणारा त्याचा भाऊ अजयला फोन केला आणि आपण बाहेर फिरायला आल्याचं त्याला सांगितलं. हा सगळा प्रकार समजल्यानंतर अजयनं भोपाळमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राला फोन केला आणि ललिता दुबे यांच्या घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितलं. त्याचा मित्र जेव्हा भोपाळमधील घरी पोहोचला, तेव्हा ललिता दुबे यांचा मृत्यू झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.
शवविच्छेदन अहवालात काय आढळलं?
घटनेची माहिती मिळताच भोपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ललिता दुबे यांचा मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तपासणीच्या अहवालात ललिता दुबे यांचा मृत्यू अतीउपासमार आणि तहान न भागल्यामुळे झाल्याचं समोर आलं.
अजयच्या तक्रारीवरून अरुणविरोधात भादंवि कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ललिता दुबे यांना त्यांच्या आजारपणामुळे अंथरुणावरून उठणं अशक्य होतं. त्यामुळे त्यांना जवळपास २४ तास पाणी पिता आलं नाही. काही खाण्यासाठी किंवा औषधं घेण्यासाठीही त्यांना उठता आलं नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवल्याची माहिती पोलिसांनी दिली.