Bhopal News: मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे नवरदेवाने लग्नास नकार दिला. तसेच लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेवाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी वधूच्या वडिलांकडे एका थार गाडीची आणि आणि १० लाख रुपयांची मागणी केली. हुंड्यात एवढ्या मोठ्या रकमेची अचानक मागणी केल्याने वधूचे कुटुंबांना मोठा धक्काच बसला. मात्र, ही मागणी पूर्ण करण्यास वधूचे कुटुंबाने नकार दिल्याने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी या लग्नास नकार दिल्याची घटना घडली आहे.

भोपाळच्या नारळ खेडा गावात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हे लग्न जमवण्यासाठी तीन वर्षांपासून चर्चा सुरु होती. यानंतर अखेर १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न होणार होतं. यासाठी वधूकडील लोकांनी लग्नाची सर्व तयारी केली. त्यानंतर लग्नासाठी पाहुणे देखील वेळेवर पोहोचले होते. मात्र, वराकडच्या लोकांनी मुलीच्या कुटुंबीयांकडे लग्नाच्या एक दिवस आधी एक थार गाडी आणि काही रक्कम देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यास लग्न न करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी आतापर्यंत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च झाल्याचे वधूकडच्या लोकांनी सांगितलं. मात्र, तरीही नवरदेवाकडच्या लोकांनी ऐकलं नाही. यानंतर अखेर वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. वधूच्या कुटुंबाने नवरदेवावर थार कारची आणि काही रकमेची मागणी केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर हे आरोप वराकडील लोकांनी फेटाळून लावले आहेत.

तक्रारीनुसार लग्नाच्या तीन दिवस आधी वराने थार गाडीसह रोख रक्कम आणि दागिन्यांची मागणी केली होती. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास लग्नाची मिरवणूक काढणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. पण वधूला सुरुवातीला वाटलं की तो विनोद करत आहे. तिने दावा केला की वराने रोख रकमेची विनंती करण्यामागे व्यवसायातील नुकसानीचं कारण असेल. मात्र, लग्नाच्या दिवशी वेगळच घडल्याने वधूलाही धक्का बसला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी वर, त्याचे आई-वडील आणि मेहुण्याविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

Story img Loader