दहशतवाद, लव्ह जिहाद, मानवी तस्करी यांसारख्या विषयांवर बनवलेला चित्रपट ‘द केरला स्टोरी’वरून देशात राजकारण सुरू आहे. या चित्रपटामुळे तापलेलं वातावरण अद्याप शांत झालेलं नाही. अशातच याबाबत एक नवीन घटना घडली आहे. देशात अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दलसह हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. अनेक ठिकाणी या संघटनांनी हा चित्रपट लोकांना दाखवला होता.
भोपाळमध्ये भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हा चित्रपट विद्यार्थिनींना दाखवला होता. ज्या विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखवला होता त्यापैकी १९ वर्षीय तरुणी तिच्या लग्नाच्या काही वेळ आधी घरातून पळून गेली. ही तरुणी युसूफ नावाच्या एका मुस्लीम तरुणाबरोबर पळून गेली आहे. ती स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेली असून आता युसूफबरोबर राहत आहे.
खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नर्सिंगच्या या विद्यार्थिनीला सल्ला दिला होता की, तिने या तरुणापासून दूर राहावं. गेल्या महिन्यात ३० मे रोजी या तरुणीचं लग्न होणार होतं. परंतु आता तिच्या कुटुंबातील सदस्यांना तिची चिंता आहे. ही तरुणी पळून जाताना घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेदेखील घेऊन गेली आहे. तरुणीच्या पालकांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. युसूफ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं तरुणीच्या पालकांचं म्हणणं आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या तरुणीला शोधून काढलं. परंतु तरुणी म्हणाली, तिला युसूफबरोबरच राहायचं आहे.
हे ही वाचा >> निवडणुकांसाठी रामदास आठवलेंचं गणित ठरलं! भाजपाकडे केल्या ‘या’ दोन मोठ्या मागण्या
या तरुणीच्या पालकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुलीला फसवलं आहे. तसेच या युसूफने आमच्या मुलीच्या नावे कर्ज घेतल्याचं त्यांनी सांगितलं. युसूफवर आधीपासूनच पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या मुलीला त्याच्याबरोबर राहण्याची परवानगी कसे काय देणार? असा प्रश्न मुलीच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. परंतु ही तरुणी १८ वर्षांची असून ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. त्यामुळे पोलीस याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत.