मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री निवासस्थान सोडण्याआधी त्यांना मोठ्या संख्येने कार्यकर्ते सदिच्छा भेट देत आहेत. अशाच एका कार्यकर्त्यांच्या भेटीच्या कार्यक्रमात शिवराज यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. बुधानी विधानसभा मतदार संघातील समर्थक आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना शिवराज यांनी आपण राज्यात सत्ता स्थापन केली नसली तरी आपली राजकीय सामर्थ्य कायम असल्याचे सांगितले आहे. आपल्या राजकीय भविष्याबद्दल चौहान यांनी अगदी फिल्मी स्टाइलमध्ये डोळे उडवत, ‘चिंता मत करना, टायगर अभी जिंदा है’ असे समर्थकांना सांगितले आहे.

भोपाळमधील मुख्यमंत्र्याचे सरकारी निवासस्थान सोडताना चौहान यांनी कदाचित मी पाच वर्षांच्या आत पुन्हा एकदा या वास्तूमध्ये येऊ शकतो असे मत नोंदवले. मुख्यमंत्री निवासस्थानी बुधानी विधानसभा मतदार संघातून आलेल्या मतदारांसमोर चौहान बोलत होते.

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईमध्ये भाजपापेक्षा अवघ्या काही जागा जास्त मिळवत काँग्रेस राज्यातील एक नंबरचा पक्ष ठरला. मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. म्हणूनच कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांबरोबरच अपक्ष आमदारांच्या मदतीने काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यास काँग्रेसला सरकार टिकावण्यासाठी कसरत करावी लागू शकते. चौहान यांच्या वक्तव्याला या पार्श्वभूमीवर अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

१५ वर्षानंतर मुख्यमंत्री निवासस्थान सोडताना अनेक वर्षांपासून चौहान यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना भेटून माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला आश्रू अनावर झाले. तसेच कार्यकर्त्यांनाही आपले आश्रू अनावर झाल्याने शिवराज यांनीच त्यांना शांत केले.

Story img Loader