वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे सर्वांच्या अंगाची लाही लाही होत आहे. उष्माघाताचा त्रास वाढवू लागल्याने सरकारपातळीवर विविध निर्णय घेतले जात आहेत. शाळा लवकर भरवण्यात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, दुपारच्या सत्रांत घरातून बाहेर पडताना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, उष्णतेचा हा त्रास केवळ मानवाला होत नसून जीवसृष्टीतील सर्व प्राण्यांना होतोय. त्यामुळेच ठिकठिकाणच्या प्राणी संग्रहालयात विशेष काळजी घेतली जात आहे.
उष्णतेच्या ज्वाळातून थंडावा म्हणून एसी, कुलर, पंख्याची सोय जशी मानवासाठी आहे, त्याचप्रमाणे या उपकरणांचा वापर प्राण्यांसाठीही करण्यात येतो. भोपाळमधील वनविहार राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांसाठी या आधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
जनावरांना उष्णतेचा त्रास होऊ नये याकरता त्यांच्या पिंजऱ्यात मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. भोपाळमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जंगलात प्राण्यांसाठी त्यांच्या पिंजऱ्यात पंखा आणि कुलर बसवण्यात आले आहेत. तर आवार थंड राहावा याकरता पिंजऱ्यांच्या आच्छादनांवर गवतही टाकण्यात येत आहे.
वन विहार राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका पद्म प्रिया बालकृष्णन म्हणाल्या की, “तापमान वाढत जात असल्याने वन्यप्राण्यांना उष्णतेच्या ज्वाळा सहन कराव्या लागत आहेत. उष्णतेवर मात करण्यासाठी प्राण्यांसाठी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पिंजऱ्यात ठेवलेल्या प्राण्यांसाठी वॉटर कुलर, पंख्यांची सोय करण्यात आली आहे. उद्यानात मुबलक पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तलावांवर हिरव्या जाळ्या बसवण्यात आल्या असून शेडसुद्धा बांधण्यात आले आहे.”
हेही वाचा >> नागपूर: ठंडा ठंडा, कुल कुल! टेकडी गणपती मंदिरात स्प्रिंकल शॉवरमुळे भाविक ‘गारेगार’
“लंगूर, मोर, सांबर, हरिण, रानडुक्कर आदी प्राणी कळपाने राहतात. त्यामुळे ठिकठिकाणी त्यांच्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. अस्वलाच्या आहारातही बदल करण्यात आला आहे. त्यांना जलयुक्त फळे देण्यात येत आहे”, असंही बालकृष्ण यांनी पुढे स्पष्ट केलं. “वाघांना त्यांच्या जाड केसांमुळे उन्हाळ्यात फार त्रास होतो. वन विहारमध्ये सध्या आठ वाघ आहेत. त्यांच्यासाठी पाण्याचे खड्डे खणण्यात आले आहेत. त्यामुळे मोकळ्या आवारात फिरणाऱ्या वाघांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही”, असेही त्या म्हणाल्या.
“उष्णतेपासून प्राण्यांचं संरक्षण करण्याकरता प्रशासनाकडून त्यांच्या आहाराचीही काळजी घेतली जात आहे. पालापाचोळा, चाऱ्यावर जगणाऱ्या प्राण्यांसाठी त्यांच्या चाऱ्यात पौष्टिक पदार्थ मिसळले जात आहे. प्रत्येक ऋतुमध्ये प्राण्यांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. उन्हाळ्याचा आराखडाही तयार केला आहे. मात्र, एकाचवेळी सर्व सुविधा दिल्या जात नाहीत. जसजसा उन्हाळा वाढत जातो त्याप्रमाणे त्यांना सुविधा पुरवल्या जातात”, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा >> Video: …अशी झाली अतिक अहमदची हत्या! पुन्हा प्रवेश, पुन्हा कोसळले दोघं; न्यायालयीन आयोगाने उभा केला तोच प्रसंग
बिरसा मुंडा अभयारण्यातही हाच प्रयोग
उन्हापासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी बिरसा मुंडा अभयारण्यातील व्यवस्थापनाने एअर कुलरची व्यवस्था केली आहे. तसेच या प्राण्यांना हंगामी फळं आणि मल्टीव्हिटॅमिन्सदेखील दिलं जात आहे. याबरोबर याप्राण्यांसाठी शेड आणि ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
यांसदर्भात बोलताना, बिरसा मुंडा अभयारण्यातील पशु चिकित्सक डॉ. ओ.पी. साहू म्हणाले, वाढत्या उन्हाची झळ नागरिकांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागली आहे. या उन्हापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही संपूर्ण अभयारण्यात एअर कुलर लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्राण्याचं थेट उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही शेडदेखील उभारले आहे.