देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले असतानाच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातील एका प्रकरणामुळे भाजपा अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. वाराणसीमधील काशी हिंदू विद्यापीठात एका तरुणीवर सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली असून सोमवारी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विरोधकांनी भाजपावर टीका करतानाच सरकारला धारेवर धरलं आहे.
नेमकं काय घडलं वाराणसी विद्यापीठात?
१ नोव्हेंबर रोजी वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठाच्या आवारात एका तरुणीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. तेव्हापासून गेल्या दोन महिन्यांत या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडून ठोस अशी कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. सोमवारी या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे(२८), सक्षम पटेल (२०) आणि अभिषेक चौहान (२२) अशी या तिघा आरोपींची नावं आहेत. यातील चौहान याच्यावर २०२२मध्ये मारहाण, धमकी आणि दंगल माजवण्याच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तिघे आरोपी भाजपाशी संबंधित?
दरम्यान, हे तिघे आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची बाब समोर येऊ लागली आहे. या तिघा आरोपींच्या फेसबुक प्रोफाईलवरून ते भाजपाच्या वाराणसीतील आयटी सेलचे सदस्य असल्याचं स्पष्ट झाल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. यातील कुणाल पांडे हा भाजपाच्या वाराणसी आयटी सेलचा कोऑर्डिनेटर आणि सक्षम पटेल हा सहाय्यक कोऑर्डिनेटर असल्याचं समोर आलं आहे.
कुणाल पांडे व सक्षम पटेल या दोघांनी त्यांच्या प्रोफाईलवर भाजपाच्या अनेक नेत्यांबरोबरचे फोटो पोस्ट केलं आहेत. हे सर्व फोटो प्रामुख्याने गेल्या तीन वर्षांमधले आहेत. यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे.
काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
दरम्यान, एकीकडे हे प्रकरण तापलेलं असताना काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. “भाजपा बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देत असते. पण आता भाजपा भारतीय जनता पार्टी नसून बलात्कारी जनता पार्टी झाली आहे”, अशी टीका काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा नेता डिसूझा यांनी केली आहे. “पंतप्रधानांच्याच मतदारसंघात एका युवतीवर सामुहिक बलात्कार होतो आणि आरोपी भाजपाच्या आयटी सेलचे सदस्य निघतात. हे बलात्कारी मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपाचा प्रचार करत असल्यामुळेच त्यांना अटक करण्यासाठी घटनेनंतर ६० दिवस लागले”, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजपानं आरोप फेटाळले
बलात्कार करणाऱ्या तिघा आरोपींचा निवडणूक प्रचाराशी संबंध नसल्याची भूमिका भाजपानं घेतलेली आहे. “त्या आरोपींचा मध्य प्रदेशशी काहीही संबंध नाही. मध्य प्रदेश निवडणुकीत ते प्रचार करत होते की नाही याविषयी मी निश्चित माहिती देऊ शकत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा मध्य प्रदेश भाजपाशी कोणताही संबंध नाही. गुन्हेगारांना कोणताही धर्म किंवा पक्ष नसतो. आमचं सरकार गुन्हेगारीविरोधात ठाम भूमिका घेत आहे. आम्ही गुन्हेगारांना पक्षात कोणतंही पद देत नाही”, अशी भूमिका भाजपाचे मध्य प्रदेश प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी मांडली आहे.
दरम्यान, हे तिघे आरोपी निवडणुकीच्या काळात भाजपाच्या सोशल मीडिया टीमचे सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. “त्यांना पक्षात कोणतंही पद देण्यात आलेलं नव्हतं, पण ते स्थानिक सोशल मीडिया टीमचा भाग होते. या काळात अनेक तरुणांना या कामात सहभागी करून घेण्यात आलं होतं. पण ते मध्य प्रदेश भाजपाचा भाग नाहीत”, असा दावा भाजपातील सूत्रांनी केल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.