वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड एक सप्टेंबरपासून भरघोस वाढवण्यात आला असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरही वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गुरुग्राममध्ये दिनेश मदान नावाच्या दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तब्बल 23 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचं समोर आल्यानंतर आता भुवनेश्वरमध्ये एका रिक्षाचालकाला तब्बल 47 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दारुच्या नशेत रिक्षा चालवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

हरिबंधू कान्हर असं या रिक्षाचालकाचं नाव असून त्याच्यावर पोलिसांनी दारु पिऊन रिक्षा चालवण्यासह अनेक नियम तोडल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे रिक्षाचालकाने आठवडाभरापूर्वीच 26 हजार रुपयांमध्ये ही जुनी रिक्षा खरेदी केली होती. दारुच्या नशेत रिक्षा चालवल्यामुळे आणि वाहन परवान्यासह अन्य काही कागदपत्र नसल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. नोंदणी प्रमाणपत्र, विम्याची कागदपत्रे, वाहन परवाना अशी अनेक कागदपत्रे नसल्याने एकूण 47 हजार 500 रुपयांचा दंड त्याला ठोठावण्यात आला. रिक्षाचालकाला चंद्रशेखरपूर येथील चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये दंडाची रक्कम भरण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.

अवश्य वाचा – (‘टॅक्स नव्हे तर ट्राफिक नियमाने आर्थिक विकास होणार’, नेटकऱ्यांचा टोला) 

याबाबत वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना, “मी सात दिवसांपूर्वीच ही रिक्षा 26 हजार रुपयांना खरेदी केली. पोलिसांनी 47 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावलाच शिवाय त्यांनी माझी रिक्षा ताब्यात घेतलीये. हे अत्यंत चुकीचं आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया रिक्षाचालकाने दिली. तसंच दारुच्या नशेत असल्याचा आरोप देखील त्याने नाकारला. तर, “आम्ही वाहन ताब्यात घेतलं आहे. त्याला दंड भरावाच लागेल. नागरिकांना सुरक्षित ठेवणं हेच आमचं लक्ष्य आहे, पण नागरिकांनीही कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करायला हवं” अशी प्रतिक्रिया प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप कुमार मोहंती यांनी दिली आहे.

देशात सध्या वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले असून वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

वाहतूक नियम अधिक कठोर –

* रस्ते नियमांचा भंग – जुना दंड १०० रु., नवीन दंड ५०० रु

* प्रशासनाचा आदेशभंग- जुना दंड ५०० रु, नवीन दंड २,००० रु.

* परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड – ५०० नवीन दंड- ५,००० रु.

* पात्र नसताना वाहन चालवणे- जुना दंड ५०० रु, नवीन दंड १०,००० रु

* वेगमर्यादा तोडणे – जुना दंड – ४०० रु, नवीन दंड – २,००० रु

* धोकादायक वाहन चालवणे, जुना दंड – १,०००, नवीन दंड ५,००० रु

* दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड २,००० रु, नवीन दंड – १०,००० रु.

* वेगवान वाहन चालवणे- जुना दंड – ५०० रु, नवीन दंड – ५,००० रु

* विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड, ५,००० रु., नवीन दंड – १०,०००

* सीटबेल्ट नसणे – जुना दंड- १०० रु, नवीन दंड – १,००० रु

* दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड -१०० रु, नवीन दंड – २,००० रु

* अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड – १०,०००

* विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड १,००० रु, नवीन दंड – २, ००० रु

* अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा — २५,००० रु. दंड व मालक – पालक दोषी. ३ वर्षे तुरुंगवास.

Story img Loader