भुज : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात झोप काढल्याबद्दल गुजरातमधील भुज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  भुजमध्ये शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात जिगर पटेल हे पेंगत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर काही तासांतच सायंकाळी राज्याच्या नगरविकास आणि नागरी गृहनिर्माण विभागाने त्यांना निलंबित केल्याचे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

‘घोर निष्काळजीपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा अभाव यांसाठी गुजरात नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमावलीच्या नियम ५(१)(अ) अन्वये पटेल यांना निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यांची गैरवर्तणूक आणि कर्तव्यात कसूर याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली’, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पटेल यांनी कच्छमधील सुमारे १४ हजार भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या निवासी गाळय़ांच्या मालकीचे दस्तऐवज त्यांना सोपवले.