राम हे भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. राम सर्वाचा असून, राम मंदिर हे देशाच्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते दुपारी १२.४० च्या मुहूर्तावर झाले. त्यानंतर संत-महंताच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमात मोदींनी ‘जय सिया राम’च्या उद्घोषात भाषणाला सुरुवात केली. त्याआधी मोदींनी पाच रुपये मूल्याच्या राम मंदिराच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. या वेळी व्यासपीठावर सरसंघचालक मोहन भागवत, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रमुख नृत्य गोपालदास, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल हे मान्यवर उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, ‘‘रामाचे अस्तित्व नष्ट करण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले; पण राम मनामनांत वसलेले आहेत. रामच आपल्या संस्कृतीचा आधार आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी त्याग केला. रामलल्लाला तंबूत राहावे लागले. आता रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. शतकानुशतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. शरयू नदीच्या किनारी सुवर्ण अक्षरांत इतिहास लिहिला जात आहे.’’

‘न भूतो न भविष्यति’ असा हा क्षण असून मी या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असल्याचा मला अभिमान वाटतो, असे मोदी म्हणाले. राम मंदिर निर्माणकार्याच्या शुभारंभाचा क्षण अनुभवायला मिळाल्याचा आनंद देशवासीयांमध्ये दिसत आहे. अवघा देश रामाचा जयघोष करत आहे. अवघा भारत राममय झाला आहे, असे मोदी म्हणाले.

राम मंदिर बांधून झाल्यानंतर फक्त अयोध्येलाच भव्यता प्राप्त होणार नाही, तर संपूर्ण परिसराची आर्थिक प्रगती होईल. जगभरातून भक्त राम-सीतेच्या दर्शनासाठी अयोध्येत येतील. अयोध्येत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतीत, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

सब का साथ सब का विकास’

सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देऊन राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग सुकर केला. या निकालादिवशीही सर्वानी शांतता राखली. आजही हीच मर्यादा पाळली जात आहे, असे सांगत मोदींनी जनतेचे कौतुक केले. राम परिवर्तनाचे, आधुनिकतेचे प्रेरणास्थान आहे. रामाने मानवता शिकवली. ज्यांनी ती अंगीकारली त्यांचा विकास झाला. जेव्हा त्याचा विसर पडला तेव्हा अधोगती सुरू झाली. आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन विकास साधायचा आहे. भारताला आत्मनिर्भर बनवायचे आहे. गांधीजींचे रामराज्याचे सूत्र हेच होते, असे मोदी म्हणाले.

सर्वमुखी रामनाम

‘जय श्री राम’, ‘सियावर रामचंद्र  की जय’ असा जयघोष, रामकथा, भजनाचे स्वर आणि हर्षोल्हासात न्हाऊन निघालेले रामभक्त असे राममय चित्र बुधवारी अयोध्येत होते. जागोजागी रामाच्या प्रतिमांचे फलक, राम मंदिर भूमिपूजनाच्या थेट प्रक्षेपण पाहण्यात रममाण झालेले रामभक्त आणि लाडू, मिठायांचे वाटप करत सुरू असलेला रामनामाचा गजर ऐतिहासिक क्षणाची साक्ष देत होता.

शेजारी देशांतही राम

भारताच्या विविध भाषांमध्ये, अगदी दाक्षिणात्य संस्कृतीतही रामायण पाहायला मिळते. विविध देशांमध्ये रामाचे पूजन होते. मुस्लीमबहुल इंडोनेशियातही रामाचे पूजन होते. कंबोडिया, लाओस, मलेशिया, थायलंड, इराण-चीनमध्येही रामकथांचे दाखले मिळतात. श्रीलंकेत जानकीहरण नावाने रामायण सांगितले जाते. नेपाळचा संबंध तर माता जानकीशीच जोडलेला आहे. राम अनंत काळासाठी जगभर मानवतेला प्रेरणा देत राहील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

स्वातंत्र्य चळवळीशी तुलना

दलित, आदिवासी, समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींना साथ दिली. अनेकांनी बलिदान दिले. त्याचप्रमाणे अनेकांच्या त्यागातून राम मंदिराची उभारणी होत आहे. त्यासाठी कित्येक पिढय़ांनी निरंतर प्रयत्न केले. त्यांच्या संघर्षांमुळे आज मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. आता भारत भविष्याकडे पाहील, पुढे जाईल. राम मंदिर भावी पिढय़ांना शतकानुशतके मार्गदर्शन करत राहील, असा मला विश्वास वाटतो, असे मोदी म्हणाले.

राम मंदिर भूमिपूजनामुळे शतकानुशतकांचे स्वप्न साकार होत आहे. ध्येयपूर्तीचा आनंद झाला आहे. या ध्येयपूर्तीत लालकृष्ण अडवाणी, दिवंगत अशोक सिंघल यांचे मोठे योगदान आहे. आत्मनिर्भर भारतासाठी आत्मभान आणि आत्मविश्वासाची गरज होती. त्याची पूर्तता भूमिपूजनाद्वारे झाली आहे.

– मोहन भागवत, सरसंघचालक

Story img Loader