पीटीआय, गांधीनगर : नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाने शनिवारी विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची नेता म्हणून निवड केली. त्यामुळे पटेल सलग दुसऱ्यांदा राज्याची धुरा सांभाळणार आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पटेल यांनी राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली व सरकार स्थापनेचा दावा केला.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी पटेल यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. १८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेत १५६ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. १२ डिसेंबर रोजी गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर पटेल राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या सोहळय़ास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे भाजपकडून कळवण्यात आले आहे. अहमदाबादमधील घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून पटेल सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विजय रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली होती.
गुजरातमधील भाजप मुख्यालय ‘कमलम’ येथे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले, की भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार समान नागरी संहिता लागू करणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य असेल. पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले, की नवनिर्वाचित आमदारांची आज ‘कमलम’ येथे बैठक झाली. त्यात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव आमदार कनू देसाई यांनी मांडला आणि त्याला आमदार शंकर चौधरी, पूर्णेश मोदी, मनीषा वकील, रमण पाटकर आणि पक्षाचे मुख्य प्रतोद पंकज देसाई यांनी पाठिंबा दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे केंद्रीय निरीक्षक म्हणून आमदारांच्या बैठकीत उपस्थित होते.
निवडीनंतर भूपेंद्र पटेल यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार व भाजप गुजरातमध्ये प्रभावीपणे काम करेल. भाजपची गुजरातवासीयांप्रती बांधिलकी कायम आहे. त्याबद्दल त्यांच्या मनात समाधान आहे. त्याद्वारे आपले प्रश्न सोडवले जातील, याबद्दल गुजरातच्या जनतेला खात्री आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. गुजरातने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपवर विश्वास ठेवला आहे.