छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याला काहीच दिवस उरले असताना, ‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले. या दाव्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.
यावर भूपेश बघेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एनडीटीव्ही’ला माहिती देताना बघेल म्हणाले, “भाजपा स्वबळावर निवडणुका लढवू शकत नाही. म्हणून ईडी, इन्कम टॅक्स, डीआरआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जात आहे. माझी प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं होतंय.”
हेही वाचा : अधोविश्व : ऑनलाइन बेटिंग अॅप
“आमच्याच सरकारनं महादेव बेटिंग अॅपच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी अनेकांना अटकही केली आहे. घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यासाठी केंद्रासह अन्य राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. पण, केंद्र सरकारनं कुठलीही मदत केली नाही. मुख्य आरोपीला अटक का केली जात नाही?” असा सवालही भूपेश बघेल यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : महादेव ऑनलाइन सट्टा; छत्तीसगडच्या इंजिनिअरने दुबईतून पाच हजार कोटींचा घोटाळा कसा केला?
दरम्यान, ईडीच्या दाव्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या भूपेश बघेल चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. बघेल यांना कथितरीत्या ५०८ कोटी रुपये पोहोचवणाऱ्या असीम दास याच्याकडून पाच कोटी ३९ लाख रुपये जप्त केल्यानंतर ईडीने त्याला अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महादेव अॅप आणि त्याच्या प्रवर्तकांची सध्या चौकशी चालू आहे.