आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील कौशंबी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी तोडफोड केली. या हल्ल्यावर प्रशांत भूषण यांनी निषेध व्यक्त करत ‘आप’च्या यशामुळे भाजप व संघपरिवारामधील संघटनांना आलेले नैराश्य या हल्ल्यातून दिसून येते असे म्हटले. आम आदमीच्या यशामुळे निराश झालेल्या निराशवाद्यांनी हा हल्ला केल्याची टीकाही भूषण यांनी केली.
प्रशांत भूषण म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये आपचा धोका यांना लक्षात आल्याने अशा प्रकारच्या संघटना असे भ्याड हल्ले करत आहेत. याआधीही याच संघटनेच्या लोकांनी २०११ साली माझ्यावर हल्ला केला होता. त्यावेळीही मी दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. परंतु, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. आजही याच संघटनेने हल्ला केला आणि यावेळीही त्याच हल्लेखोरांचा यात समावेश होता. यातील एक जण एक संकेतस्थळ चालवितो आणि या संकेतस्थळाला एक भाजप नेता प्रोत्साहन देत आला आहे.”
आज सकाळी ३० ते ४० तरुणांचा जमाव कौशंबी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाच्या परिसरात घुसला होता. यावेळी पक्षाच्या आणि प्रशांत भूषण यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या काही कार्यकर्त्यांनी हिंदू रक्षा दलाचे कापडी फलक याठिकाणी झळकावले.
कौशंबीमध्ये ‘आप’च्या कार्यालयावर हल्ला; प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याचा निषेध

Story img Loader