आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय साहायक बिभव कुमार यांना अटक केली आहे. भाजपानेही या प्रकरणावरून आम आदमी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटताना दिसून येत आहेत. दरम्यान, बिभव कुमार यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत आता त्यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिभव कुमारचे वडील महेश्वर राय यांनी नुकताच एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी बोलातना आपला मुलगा निर्दोष असून त्याच्यावर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. “माझा मुलगा साधाभोळा आहे. तो गेल्या १५ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या बरोबर आहे. मात्र, या १५ वर्षात त्यांने कोणाशी गैरवर्तन केल्याची एकही तक्रार आलेली नाही. आज त्याला अटक करण्यात आली आहे. हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी हे भाजपाचे षडयंत्र असून भाजपाने अनेकदा केजरीवाल यांची साथ सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला”, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा – स्वाती मालिवाल मारहाण प्रकरण : ‘आप’कडून आरोपांचे खंडन, भाजपचे केजरीवालांविरोधात कारस्थान असल्याचा आरोप
पुढे बोलताना ते म्हणाले, “ही घटना घडली, त्यापूर्वी मी फोनवर बिभवशी बोलत होतो. तो नाश्ता करत होता. त्यावेळी स्वाती मालिवाल त्या ठिकाणी आल्या. सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बिभवने मालिवाल यांना स्पर्शदेखील केला नाही. बिभवने त्यांना फक्त एवढच सांगितले की परवानगीशिवाय मी तुम्हाला अरविंद केजरीवाल यांना भेटू देणार नाही. हे ऐकूण मालिवाल यांना राग आला आणि त्यांनी बिभवला धमकी दिली.”
दरम्यान, बिभव कुमार यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच स्वाती मालिवाल यांचा वैद्यकीय अहवाल देखील समोर आला आहे. या अहवालात त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून उजव्या डोळ्याखालीही जखमेच्या खुणा आहेत. तसेच त्यांच्या शरीरावर एकूण चार जखमांच्या खुणा आहेत.
नेमकं प्रकरण काय?
१३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मला मारहाण करण्यात आली, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला होता. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय साहायक बिभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यावेळी स्वाती मालिवाल यांनी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. तत्पूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना समन्स बजावले होते. यानुसार बिभव कुमार यांना १७ मे रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता. याप्रकरणी आता त्यांना अटक करण्यात आली आहे.