भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांबाबत व्हाईट हाऊसने संयुक्त निवेदन जारी केले आहे. यानुसार, पाकिस्तानने त्यांच्या भूमीचा वापर दहशतवादी हल्ल्यासाठी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि नरेंद्र मोदी यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हे निवदेन देण्यात आले आहे.
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेपलिकडील दहशतवादाचा, दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशाचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी होणार नाही, याची खात्री करण्याचे आणि त्यासाठी त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे,” असं व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटलं आहे.
हेही वाचा >> Video : “भारतात हॅलोविन अन् अमेरिकेत नाटू नाटू…”, व्हाईट हाऊसमधील स्नेहभोजन कार्यक्रमात मोदी नेमकं काय म्हणाले?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण वातावरण आहे. १९४७ साली ब्रिटिश शासन संपुष्टात आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्याने संघर्ष होत आहेत. मुस्लिमबहुल काश्मीरवर दोन्ही देश दावा करत असल्याने हा संघर्ष होत आहे. पाकिस्तानने यासाठी सतत वाकडी वाट धरल्याने भारतानेही त्यांना नेहमीच चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काश्मीरवर दोन्ही देशांनी दावा केल्याने या दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत.
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी अल-कायदा, ISIS/Daesh, लष्कर-ई-तय्यबा (LeT), जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि हिजबुलसह सर्व दहशतवादी गटांविरुद्ध ठोस कारवाई करा”, असा पुनरुच्चार या संयुक्त निवेदनातून करण्यात आला आहे.
हेही वाचा >> “दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू, तो मोडून काढण्यासाठी…” अमेरिकन संसदेत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
दहशतवादाच्या मुद्द्यावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
अमेरिकेच्या संसदेला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांननी अमेरिकेवर झालेला ९/११ चा हल्ला आणि भारतावर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला याबाबत आपल्या भाषणात भाष्य केलं. ते म्हणाले, “दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावं लागेल. आपल्या देशांची एकजूट या दहशतवादाचा सामना करु शकते. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही दहशतवादाचा धोका आहेच. त्याचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.