सिंह आणि सिंहिणीचं नाव अकबर आणि सीता ठेवणाऱ्या त्रिपुरातील प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्याला त्रिपुरा सरकारने निलंबित केले आहे. नामकरणावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्रिपुरा सरकारकडून राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन) प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित करण्यात आले आहे. सिंह अन् सिंहिणीची अशी नावे ठेवून आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने (VHP) कोलकाता उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेनंतर हे निलंबन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय प्रकरण आहे?

त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणिसंग्रहालयातून १२ फेब्रुवारीला उत्तर बंगालच्या सिलीगुडी येथील सफारी पार्कमध्ये आणलेल्या वन्य प्राण्यांची विचित्र नावे असल्याचे बातमीवरून समजले. बांगला वृत्तपत्र उत्तरबंगा संवादमध्ये यासंदर्भात बातमी छापून आली होती. बातमीला “संगीर खोजे अस्थिर सीता (सीता आपल्या साथीदारामुळे अस्वस्थ आहे)” असा मथळा दिला होता. त्यानंतर हा वाद उफाळून आला. देशभरातील सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत याविरोधात विश्व हिंदू परिषदेकडून याचिका दाखल करण्यात आली. उत्तरबंगा संवादने राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सचिवाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकाची माहिती प्रकाशित केली, ज्यात सिंहांच्या नावांचा उल्लेख आहे. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने हे अतार्किक आणि अपमानजनक नामकरण असल्याचे सांगत कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्रिपुराच्या सिपाहिजाला प्राणिसंग्रहालयातून आठ प्राणी सिलिगुडी सफारी पार्कमध्ये आणण्यात आलेत. यामध्ये ‘अकबर’ आणि ‘सीता’ नावाच्या सिंह आणि सिंहिणींचाही समावेश आहे. १६ फेब्रुवारी रोजी विहिंपने याबाबत कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सिंह आणि सिंहिणीला ‘अकबर’ आणि ‘सीता’ असे नाव देणे हा हिंदूंचा अपमान असल्याचे विहिंपने म्हटले आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायमूर्ती भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर २१ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. सिंहिणीला सीतेचे नाव का दिले? कारण हे नाव स्नेहभावाने ठेवता आले असते, असं न्यायमूर्तींनी सांगितले. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ही हिंदू धर्माची निंदा आहे, प्रेमळपणा नाही. जर प्राण्यांना देवतांची नावे देण्यास परवानगी दिली तर उद्या गाढवाचे नावदेखील एखाद्या देवतेचे नावावरून ठेवले जाईल. त्यानंतर सिंहांची नावे नेमकी कोणी ठेवली हे अस्पष्ट असल्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला या विषयावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले. कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नाव बदलण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले, ‘देशातील एक मोठा वर्ग सीतेची पूजा करतो. मीही अकबर हे नाव सिंहाला देण्यास विरोध केला असता. तो एक कार्यक्षम, यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मुघल सम्राट होता.

पश्चिम बंगाल सरकार नाव बदलणार

पश्चिम बंगाल सरकार आधीच अनेक वादात अडकले असून, सिंह आणि सिंहिणीच्या नावांबाबतचा वाद टाळता आला असता, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पश्चिम बंगाल सरकारने सिंह आणि सिंहिणीची नावे बदलण्यास सहमती दर्शवली आहे. विहिंपची याचिका फेटाळण्याची मागणीही सरकारने केली होती. परंतु कोलकाता उच्च न्यायालयाने ते मान्य केले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big action in the controversy of naming the lion akbar and the lioness sita tripura praveen lal aggarwal officer suspended vrd