क्युबाची राजधानी हवाना येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला आहे. सेराटोगा असं स्फोट झालेल्या हॉटेलचं नाव आहे. ही घटना घडल्यानंतर हॉटेलमधून प्रचंड धुराचे लोट बाहेर निघत होते. बचाव दलाचं पथक घटनास्थळी असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. सुरक्षा दलांनी हॉटेलला वेढा घातला आहे. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हॉटेलमध्ये गॅस गळती झाल्याने हा स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष मिगुल डियाझ आणि त्यांचे काही मंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी घटनेचा सविस्तर आढावा घेतला असून बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे. हवानाचे सचिव लुईस अँटोनियो यांनी सांगितलं की, आम्हाला ढिगाऱ्याखाली काही मृतदेह आढळून आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अद्याप अडकले असण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या सर्व पुरावांच्या आधारे हा अपघात असल्याचं स्पष्ट होत आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या वाहनांच्या कांचाना देखील तडा गेला आहे, अशी माहिती हवानाचे सचिव लुईस अँटोनियो यांनी दिली आहे.
न्यूयॉर्क पोस्टने सूत्रांच्या हवाल्यानं आपल्या वृत्तात म्हटलं की, द्रवरूप गॅस टँकरमधून गॅस सिलिंडरमध्ये भरत असताना हा स्फोट झाला. हा स्फोट क्युबासाठी मोठा आर्थिक तोटा ठरू शकतो. कारण करोना साथीनंतर आता क्युबातील पर्यटन क्षेत्राला वेग आला आहे. अशात हा स्फोट घडल्यानं पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. तसेच अमेरिकेच्या निर्बंधांमुळे येथील अर्थव्यवस्था आधीच वाईट स्थितीतून जात आहेत. त्याचबरोबर क्युबामध्ये सरकारच्या विरोधात अनेक निदर्शनं झाली आहेत.