Haryana BJP Vice President Joins Congress: एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं वातावरण तापू लागलेलं असताना दुसरीकडे महाराष्ट्राआधी मतदान होणाऱ्या हरियाणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आधी केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर कुस्तीपटूंच्या तीव्र आंदोलनाचं नेतृत्व करणारे विनेश फोगट व बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता हरियाणात भाजपासमोर दुसरं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. हरियाणा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व पक्षाचे राज्यातील वरीष्ठ नेते जी. एल. शर्मा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते व दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेले भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या उपस्थितीत जी. एल. शर्मा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपासमोर नवा पेच?
जी. एल. शर्मा हे हरियाणाच्या राजकीय वर्तुळातलं मोठं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षासाठी हरियाणामध्ये काम करत असून पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र, ऐन निवडणुकांच्या तोंडावर शर्मा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे हरियाणा भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे विनेश फोगट व बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे हरियाणात भाजपासाठी पेपर कठीण होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षच काँग्रेसमध्ये गेल्यामुळे भाजपासमोर अडचण निर्माण झाली आहे.
जी. एल. शर्मा यांनी बराच काळ हरियाणा डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं अध्यक्षपदही सांभाळलं आहे. त्यामुळे हरियाणात मोठ्या संख्येनं असणाऱ्या दुग्ध व्यावसायिक व उत्पादकांमध्ये त्यांचं नाव चिरपरिचित आहे. शिवाय, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांचं राज्यातील राजकीय वजन काँग्रेससाठी आगामी निवडणुकीत जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.
शर्मांच्या काँग्रेस प्रवेशावर भूपिंदर सिंग हुड्डा म्हणतात…
दरम्यान, भूपिंदर सिंग हुड्डा यांनी शर्मा यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला नवी ताकद मिळणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “शर्मा यांच्या रुपाने काँग्रेस पक्षात नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणि संघटनेला एक नवी ऊर्जा मिळणार आहे”, असं ते म्हणाले.
Haryana Election 2024: भाजपाकडून हरियाणात घराणेशाही पॅटर्न; आठ उमेदवारांचा राजकीय वारसा
भाजपातून आऊटगोईंग?
भारतीय जनता पक्षानं हरियाणा निवडणुकीसाठी ९० पैकी ६७ उमेदवारांची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या राज्य संघटनेत अनेक जण नाराज असल्याचं बोललं जात आहे. या नाराजीतून काहीजणांनी पक्षाला रामराम ठोकला असून त्यात काही आजी-माजी आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे भाजपासमोर पक्षातील नाराजांना सांभाळणं, हे मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
भूपिंदर सिंग हुड्डा यांची भाजपावर टीका
दरम्यान, भूपिंदर सिंग हुड्डा यांनी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी बोलताना भाजपावर टीका केली. “इथल्या तरुणांना बेरोजगारीनं सतावलं आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याचा योग्य मोबदला मिळत नाही, खेळाडूंना योग्य तो सन्मान मिळत नाही, लष्कराच्या अग्निवीर योजनेमुळे जवानांमध्ये नाराजी आहे, महिला सुरक्षेचा अभाव व महागाईमुळे त्रस्त आहेत. जेव्हा राज्यात काँग्रेसचं सरकार स्थापन होईल. तेव्हा शेतकरी, जवान, कुस्तीपटू, महिला, तरुण, नोकरी देणारे व नोकरी शोधणारे, गरीब, कामगार अशा सगळ्यांच्या समस्या सोडवल्या जातील”, असं हुड्डा म्हणाले.