रेल्वेच्या ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम’मध्ये हेतूपूर्वक छेडछाड केल्यामुळेच ओडिशातील कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाल्याचा दावा वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे. रेल्वे विभागाने केलेल्या प्राथमिक तपासात ही बाब उघड झाल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने रेल्वे विभागातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे आता या प्रकरणी सीबीआयही चौकशी करत आहे.
बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथे इंटरलॉकिंग सिस्टम केबिनमध्ये जाऊन यंत्रणेत छेडछाड केली. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत दोष निर्माण झाला, असं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच सीबीआय चौकशीमुळे असा मानवी हस्तक्षेप झाला असेल तर त्याचा शोध लागण्यास मदत होईल, असंही नमूद केलं.
“सीबीआय चौकशीत दोषी कोण आणि त्यांचा हेतू काय हे समोर येणार”
सीबीआय चौकशीत या अपघातातील दोषी कोण आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे हे समोर येईल, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत रेल्वे यंत्रणेत छेडछाड झाल्याचे पुरावे मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा : ओडिशातील भीषण अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया, लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख करत म्हणाले, “राजीनामा…”
“…तर सर्व सिग्नल रेड झाले असते”
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी (४ जून) रेल्वे सिग्नल यंत्रणा अगदी सुरक्षित असल्याचं सांगताना त्यात दोष निर्माण झाला असता, तर सर्व सिग्नल रेड झाले असते आणि सर्व रेल्वे जाग्यावर थांबल्या असत्या असं मत व्यक्त केलं. तसेच यंत्रणेत मानवी हस्तक्षेप झाल्याशिवाय रेल्वेचा मार्ग बदलू शकत नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा : “मोदी दिवसातून पाचवेळा ड्रेस…”, ओडिशा रेल्वे अपघातानंतर काँग्रेसचा हल्लाबोल, VIDEO ट्वीट करत म्हणाले…
असं असलं तरी यंत्रणेत छेडछाड करण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील केबिन उघडी होती का? या प्रश्नाचं रेल्वे विभागाने उत्तर दिलेलं नाही. अनेक रेल्वे तज्ज्ञांनी रेल्वेचा मार्ग एकदा यंत्रणेत निश्चित झाल्यावर बदलता येत नाही, असं मत नोंदवलं. ती रेल्वे त्या मार्गावरून गेल्यावरच त्या मार्गात बदल करता येतो, असंही त्यांनी नमूद केलं.