देशभरात बेरोजगारीवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. केंद्रासह विविध राज्य सरकारं नोकऱ्यांच्या घोषणाही करतं. मात्र, यानंतरही बेरोजगार तरुणांचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे मागील मोठ्या काळापासून परदेशाप्रमाणे भारतातही शिक्षण असूनही नोकरी न मिळालेल्या तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आता छत्तीसगड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार छत्तीसगडमध्ये बेरोजगार तरुणांना महिन्याला २५०० रुपयांचा भत्ता मिळणार आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राज्याचा २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर करताना बेरोजगारी भत्ता देण्याबाबत घोषणा केली. यानुसार १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगार तरुणांना हा भत्ता मिळणार आहे. ज्या तरुणांच्या घरातील वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असेच युवक या भत्त्यासाठी पात्र असणार आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही वाढ
इतकंच नाही तर मुख्यमंत्री बघेल यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही वाढ केली आहे. यानुसार अंगणवाडी सेविकांचं मानधन ६,५०० वरून १०,००० रुपये करण्यात आलं. तसेच अंगणवाडी मदतनीसांचं मानधन ३,५५० वरून ५,००० रुपये करण्यात आलं.
याशिवाय रायपूरमधील डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक रुग्णालयात ७०० बेडची व्यवस्था उभारण्यासाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच दुर्गम भागात वैद्यकीय उपचार पोहचावेत यासाठी मोबाईल मेडिकल युनिटसाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.