CPI(M) General Secretary Sitaram Yechury Passes Away : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या कुटुंबाने आज मोठा निर्णय घेतला. सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांना अभ्यास आणि संशोधनासाठी दान केला आहे. येचुरी यांचा आज वयाच्या ७२ व्या वर्षी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी श्वसनाच्या गंभीर संसर्गामुळे निधन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीपीआय(एम) सरचिटणीस १९ ऑगस्टपासून एम्समध्ये उपचार घेत होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होत होती. परंतु, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

एम्स रुग्णालयाने यासंदर्भातील मेडिकल बुलेटिन जारी केले. यामध्ये लिहिले होते की, सीताराम येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी न्युमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०५ वाजता त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह एम्स रुग्णालयाला अध्यापन आणि संशोधनासाठी दिला आहे.

राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीताराम येचुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “सीताराम येचुरी माझे चांगले मित्र होते. आपल्या देशाबद्दल त्यांना सखोल अशी समज होती. इंडिया या कल्पनेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. आमच्या होणाऱ्या प्रदीर्घ चर्चा माझ्या कायम स्मरणात राहतील. या कठीण प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व कार्यकर्त्यांसोबत माझ्या सद्भावना आहेत”, अशी पोस्ट राहुल गांधींनी एक्स अकाऊंटवर केली आहे.

सीताराम येचुरी यांची राजकीय कारकिर्द

सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलनं झाली. माकपचे नेते व खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारला होता.

सीताराम येचुरी यांनी १९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यदेखील झाले. १९७५ साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली. १९७७-७८मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. प्रकाश करात यांच्यासह सीताराम येचुरी यांनी त्या काळात जेएनयूमधील डाव्या विचारप्रवाहाचं नेतृत्व केल्याचं मानलं जातं.

१९८४ साली सीताराम येचुरी माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले. पॉलिट ब्युरोमध्ये त्यांचा प्रवेश झाला. २०१५ साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त झाले. यादरम्यान त्यांनी तब्बल १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं. या काळात त्यांनी कामगार, मागासवर्ग, मध्यमवर्ग यांचे अधिकार यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big decision of sitaram yechurys family body donation to the hospital for research sgk