बँक म्हटलं की ग्राहक अगदी विश्वासानं आपले पैसे खात्यात जमा करतात. तिथं ते सुरक्षित राहतील अशीच भावना ग्राहकांची असते. मात्र, एचडीएफसी बँकेत एक गंभीर प्रकार उघडकीस आलाय. बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच एका महत्त्वाच्या भारतीयवंशाच्या परदेशी व्यक्तीच्या बँक खात्यातून मोठी रक्कम करण्याचे प्रयत्न केलेत. या प्रकरणी पोलिसांनी ३ बँक कर्मचाऱ्यांसह एकूण १२ जणांना अटक केलीय. इतकंच नाही तर या आरोपींनी संबंधित व्यक्तीच्या नावे चेकबूक देखील काढले. हा सर्व प्रकार दिल्लीत घडला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत या आरोपींच्या टोळीकडून फसवणूक करून काढलेलं चेकबूक आणि एनआरआयच्या मूळ मोबाईल क्रमांकाशी मिळताजूळता मोबाईल क्रमांक जप्त केला आहे. बँक खातेदार अमेरिकेत राहतो. विशेष म्हणजे या टोळीने या व्यक्तीच्या खात्यावरून तब्बल ६६ वेळा ऑनलाईन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. सायबर सेलच्या विशेष पथकाला हे रॅकेट उघड झाल्यानंतर तपासात या गोष्टी समजल्या आहेत.
परदेशी नागरिकाशी मिळताजुळता भारतीय मोबाईल क्रमांकाचा वापर
आरोपींनी परदेशी नागरिकाच्या बँक खात्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाशी मिळताजुळता भारतीय मोबाईल क्रमांक मिळवला. त्याचा उपयोग करून खात्यातील मूळ मोबाईल क्रमांकही बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय फसवणूक करून काढलेल्या चेकबूकचा उपयोगही करण्यात आला. या चेकद्वारे बँकेतूनही पैसे काढण्याचे प्रयत्न झाले. या प्रकरणी एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) सायबर सेलकडे तक्रार केलीय. तसेच या खात्यावर अनेकवेळा अनधिकृत लॉगिन करण्याचे आणि ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रयत्न झाल्याचं म्हटलं आहे.
ऑनलाईन व्यवहारांचा माग काढत २० ठिकाणी छापेमारी, १२ आरोपींना अटक
असंख्य अनधिकृत व्यवहाराचे प्रयत्न आणि भविष्यात होणाऱ्या घोटाळ्याचा विचार करून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आलीय. हे पथक हे ऑनलाईन व्यवहार कोठून झाले त्याचे लोकेशन, डिजीटल फूटप्रिंट शोधणार आहे. याशिवाय तांत्रिक पुरावे गोळा करून आरोपींचा पर्दाफाश करणार आहे. या तपासातूनच सध्या या पथकाने दिल्ली आणि परिसरात जवळपास २० ठिकाणी छापेमारी केली. यात एकूण १२ आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. यात तिघे एचडीएफसी बँकेचेच कर्मचारी आहेत.
या खात्यातून या आधी देखील पैसे काढण्याचे प्रयत्न झाले होते. त्या प्रकरणी गाझियाबाद आणि मोहाली येथे दोन गुन्हे देखील दाखल झालेत.
आरोपींचा याच खात्यावर डोळा का?
रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराला या खात्यात मोठी रक्कम असून हे खातं निष्क्रिय असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यानं बँकेतील कर्मचाऱ्यांना १० लाख रुपये आणि १५ लाख रुपयांचा विमा व्यवसाय करून देण्याचं आमिष दाखवलं. जेणेकरून या कर्मचाऱ्यांना बँकेत बढती मिळेल. याच्या बदल्यात त्यानं या कर्मचाऱ्यांकडून या खात्याशी संबंधित माहिती मिळवली. तसेच चेकबूक देखील मिळवले.
हेही वाचा : सावधान, Gmail, Outlook वापरणाऱ्यांना फसवे गिफ्ट ई-मेल! वाचा यापासून कसं सुरक्षित राहायचं?
या चेकबूकमधील चेक आरोपीने वेगवेगळ्या लोकांना वाटले आणि पैसे घेण्यास सांगितले. काही लोकांना बँकेचा फोन आल्यास मालक असल्याचं भासवत परवानगी देण्यासही सांगितलं. आरोपी बँक कर्मचाऱ्यांनी देखील या खात्याचा नोंदणी मोबाईल क्रमांक बदलण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींच्या सर्व प्रयत्नांनंतरही पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या या प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. तसेच तपासाचं कामही केलं जातंय.