पीटीआय, नवी दिल्ली : भारतातील सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) रशियातील बडी तेलउत्पादक कंपनी ‘रॉसनेफ्ट’सोबत करार केला असून याअंतर्गत रशियातून कच्च्या तेलाची आयात मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात येणार आहे.
‘रॉसनेफ्ट’ने जारी केलेल्या निवेदनानुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इगोर सेचिन यांनी अलिकडेच भारताला भेट दिली. यावेळी सेचिन आणि आयओसीचे अध्यक्ष माधव वैद्य यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप पुरी उपस्थित होते. ‘रॉसनेफ्ट’ आणि भारतीय तेल कंपन्यांसोबत आगामी काळात अधिकाधिक व्यापार वाढविण्याबरोबरच डॉलरऐवजी स्थानिक चलनांमध्ये व्यवहार करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपातील देशांनी रशियाकडून आयात घटविली आहे. त्यानंतर भारतासह काही देशांना रशियाकडून स्वस्तात तेलाची निर्यात केली जात आहे.गेल्या वर्षभरात रशियाकडून भारतातील तेल आयातीत २० पट वाढ झाली असून मार्चमध्ये रशियाच्या ‘उरल्स ग्रेड क्रूड’चा भारत हा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आहे.