नीट पीजी २०२४ परीक्षेची नवीन तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा आता ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रामध्ये घेतली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना एनबीईएमएसकडून जारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (NBEMS) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट पीजी २०२४ या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार आता ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रात ही परीक्षा घेतली जाणार आहे.

११ ऑगस्ट रोजी देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. नीट पीजी २०२४ ची परीक्षा २३ जून रोजी होणार होती. मात्र, परीक्षेच्या एक दिवस आधी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परिक्षेसंदर्भातील अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वर पाहता येणार आहे.

प्रवेशपत्र कधी भेटणार?

नीट पीजी २०२४ परीक्षेची नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर आता परीक्षेच्या नवीन तारखेसह नीट पीजी २०२४ परीक्षेसाठी प्रवेशपत्र पुन्हा जारी करण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या आधी एक आठवडा हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध केले जाणार आहेत. यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत.

दरम्यान, नीट पीजी २०२४ ही परीक्षा यापूर्वी २३ जून रोजी होणार होती. मात्र, पेपर लीक आणि परीक्षेत गोंधळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भातील निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. नीट-पीजी २०२४ परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते. परीक्षेतील गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या देशव्यापी परीक्षेतील गोंधळानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र, आता ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रामध्ये घेतली जाणार आहे.