ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले. यानंतर हा भीषण अपघात का झाला, त्यामागील कारणं काय याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच या अपघातामागील एका मोठ्या कारणाचा खुलासा झाला आहे. यानुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. त्यातूनच अपघात झाला, असं वृत्त एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात इतका भीषण होता की, या रेल्वेचे २१ डबे रुळावरून घसरले आणि ३ डबे तर थेट दुसऱ्या मार्गावर जाऊन पडले.
नेमकं काय घडलं?
कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर थांबा नसल्याने कोरोमंडल भरधाव वेगाने प्रवास करत होती. याचवेळी कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथे एका मालवाहू रेल्वेला धडक बसली आणि कोरोमंडलचे २१ डबे रुळावरून खाली उतरले. इतकंच नाही, तर तीन डबे जोरदार धडकेने उडून दुसऱ्या रेल्वे मार्गावर पडले.
यावेळी यशवंतपूर-हावरा एक्स्प्रेस बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथून जात होती. तेव्हा हावरा एक्स्प्रेसची रेल्वे मार्गावरील दोन डब्यांना धडक होऊन अपघात झाला.
हेही वाचा : ओडिशातील भीषण अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया, लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख करत म्हणाले, “राजीनामा…”
रेल्वेत किती प्रवासी?
कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये आरक्षित जागांचे बुकिंग केलेले १२५७ प्रवासी होते, तर यशवंतपूर-हावरा एक्स्प्रेसमध्ये १ हजार ३९ प्रवासी होते.