LPG Cylinder Price Today : देशातील महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. १ सप्टेंबरपासून १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांपर्यंत मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही दरकपात केवळ व्यावसायिक सिलिंडरवरच झाली असून, १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किंमतीतच उपलब्ध असणार आहे.
आजपासून दिल्लीत एक १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर ९१.५० रुपयांनी, कोलकात्यात १०० रुपयांनी, मुंबईत ९२.५० रुपयांनी तर चेन्नईमध्ये ९६ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे . व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी झाल्याचा फायदा देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किंमती –
नव्या दरानुसार १९ किलोचा हा एलपीजी सिलिंडर आता दिल्लीत १८८५ रुपये, कोलकात्यात १९९५ रुपये, मुंबईत १८४४ रुपये आणि चेन्नईमध्ये २०४५ रुपयांना मिळणार आहे.
मागील काही काळापासून एलपीजी सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे. १९ मे २०२२, १ जून २०२२, १ जुलै २०२२, ६ जुलै २०२२ आणि १ ऑगस्ट २०० रोजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आलेल्या आहेत.
घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही –
सहा जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच सिलिंडर अजूनही त्याच किंमतीत मिळेल. इंडेन सिलिंडरची किंमत दिल्लीत १०५३ रुपये असेल, तर कोलकात्यात १०७९ रुपये, मुंबईत १०५२ रुपये, चेन्नईमध्ये १०६८ रुपये असेल.