नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. NMC ने युक्रेनच्या ‘मोबिलिटी प्रोग्राम’ला मान्यता दिली. त्यामुळे असे सर्व विद्यार्थी आता इतर देशांच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार एनएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या आदेशाचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. तर, हे त्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे, ज्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये नवीन नियम लागू झाल्यानंतर युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला होता.
भारताची भूमिका कायम –
तसेच, एनएमसीने असे म्हटले आहे की, युक्रेनच्या मोबिलिटी प्रोग्राम अंतर्गत पदवी ही मूळ युक्रेनियन विद्यापीठाद्वारे जारी केली जाईल. तर, युक्रेनमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्यांच्या अभ्यासात रशियन आक्रमणामुळे व्यत्यय आला होता, त्यांना भारतीय महाविद्यालयांमध्ये त्यांचे शिक्षण सुरू ठेवू न देण्याबाबत भारताची भूमिका कायम आहे.
भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा २०१९ तसेच कोणत्याही परदेशी वैद्यकीय संस्थांमधून भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना स्थानांतरीत करण्याच्या नियमांमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी जुलै २०२२ मध्ये लेखी उत्तरात ही माहिती लोकसभेला दिली होती.
सुमारे १८ हजार वैद्यकीय विद्यार्थी युक्रेनमधून परतले –
मागील वर्षी, स्क्रिनिंग टेस्ट रेग्युलेशन २००२ ची जागा फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग रेग्युलेशन २०२१ ने घेतली होती. ज्यामध्ये अभ्यासक्रमाचा कालावधी, विषय आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त वर्षांची अट होती.
फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुमारे १८ हजार वैद्यकीय विद्यार्थी युक्रेनमधून परतले. FMGE परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आकडेवारीवर आधारित, मागील पाच वर्षांत सुमारे तीन हजार ते चार हजार भारतीय विद्यार्थी दरवर्षी युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गेलेले होते.