Kailash Gehlot Resigns from AAP: महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता यानंतर विधानसभा निवडणुका होणाऱ्या दिल्लीमध्ये राजकीय धुमशान सुरू झाले आहे. दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी रविवारी परिवहन मंत्रिपदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले असून त्यात पक्षाने आपली आश्वासने पाळली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्ष आता सामान्य जनतेचा उरला नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.

कैलाश गेहलोत यांनी आपल्या पत्रात लिहिले की, शिशमहाल सारखे अनेक लाजिरवाणे आणि अजब असे वाद पक्षाशी जोडले गेले आहेत. या वादामुळे पक्षातील सर्व सदस्य संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून आपण अजूनही ‘आम आदमी’ आहोत, असा विश्वास वाटतो का? दिल्ली सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्र सरकारशी झगडण्यात घालवत आहे, हे तर आता स्पष्ट झाले आहे. याने दिल्लीची प्रगती होणार नाही. त्यामुळेच पक्षापासून वेगळे होण्याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. यासाठीच मी पक्षाचा राजीनामा देत आहे.

कैलाश गेहलोत यांच्याकडे परिवहन खात्यासह प्रशासकीय सुधारणा, माहिती तंत्रज्ञान, महिला आणि बाल विकास अशा खात्यांची जबाबदारी होती. त्यांनी या सर्व खात्यांचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळातील कैलाश गेहलोत हे प्रमुख नेते होते. पक्षाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, यामुळे ते अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. यमुना नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाला त्यांनी शिशमहाल असे नाव दिले आहे.

राजीनामा पत्रात आणखी काय लिहिले?

अरविंद केजरीवालजी, तुम्ही मला आमदार आणि नंतर मंत्री म्हणून दिल्लीच्या जनतेची सेवा करण्याची आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. याशिवाय मला सांगायचे आहे की, आज आम आदमी पक्षासमोर अनेक गंभीर आव्हाने आहेत. काही अंतर्गत आव्हानेही आहेत. जी मूल्य घेऊन आपण सुरुवात केली होती, राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आता ती मूल्य मागे पडली आहेत. यामुळे आपलीच अनेक वचने आता अपूर्ण राहिली आहेत.

Story img Loader